दुचाकीस्वाराला वाऱ्याचा वेग नडला; एकाला गाडीने धडकून गाडी चालकाचाच मृत्यू
By योगेश पांडे | Updated: July 2, 2024 17:44 IST2024-07-02T17:40:12+5:302024-07-02T17:44:05+5:30
Nagpur : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला हा विचित्र अपघात

The driver died in an accident near Hingana road
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेमुळे एका पादचारी गंभीर जखमी झाला. तर दुचाकीस्वाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. घटनास्थळावरच एक चारचाकी वाहन रस्त्यावर उभे असल्याने त्याला धडकून आणखी एक दुचाकीस्वारदेखील जखमी झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा विचित्र अपघात झाला.
शुभम लक्ष्मण नागपुरे (२४, बुटीबोरी) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वर्धा मार्गावरील जुन्या टोलनाक्याजवळून शुभम वेगाने दुचाकी चालवत होता. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती पायी रस्ता ओलांडत असताना शुभमने त्याला धडक दिली. त्यात समोरील व्यक्ती व शुभम दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एम्समध्ये नेले असता डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. तर जखमीवर उपचार सुरू आहे. अपघात होत असतांना घटनास्थळी एमएच ४० सीटी १३६४ या क्रमांकाचे चारचाकी वाहन रस्त्यावरच उभे होते. त्या वाहनाला संजय बाबुराव कांबळे (३२, वर्धा) हे मागून धडकले. त्यात ते जखमी झाले. त्यांना मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांनी शुभम तसेच आरोपी चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.