लिबर्टीज टॉकीजजवळ उड्डाणपुलाचे डिझाइन बदलणार, ४० कोटी झाले मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:29 IST2025-06-13T18:16:23+5:302025-06-13T18:29:34+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती : अशोक चौक व मेडिकल चौक सिग्नल मुक्त होणार

The design of the flyover near Liberty Talkies will be changed, Rs 40 crore has been approved.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर उड्डाणपुलावर लिबर्टी टॉकीजकडील उतरण्याच्या भागात तांत्रिक त्रुटीमुळे नेहमी वाहनांची कोंडी होते. कामठी रोडवर जाणाऱ्यांना सदर मार्गे किंवा नासुप्र समोरून पुलाच्या खालून जावे लागते. आता ही समस्या सोडविण्यासाठी या उड्डाणपुलाचे डिझाइन बदलण्यात येणार आहे. यासाठी एनएचआयकडून ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरी म्हणाले, गेल्या ११ वर्षात नागपूर शहरात उड्डाणपुलांचे जाळे उभारण्यात आले आहे. कमाल चौक ते ताजबागपर्यंत उड्डाणपूल उभारला जात आहे. यात अत्याधुनिक मलेशियन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. कमाल चौकात ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक भव्य मार्केट तयार केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना येथे दुकाने दिली जातील. अशोक चौकाला ट्रॅफिक सिग्नल मुक्त चौक बनविण्यात आले आहे. मेडिकल चौकातही असाच प्रयोग करण्यासाठी नियोजन झाले आहे. मोमिनपुऱ्याला थेट कडबी चौकाशी उड्डाणपुलाद्वारे जोडले जाईल. शहरातील इतर भागातही उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असून यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी माजी खा. अजय संचेती, आ. डॉ. परिणय फुके, आ. संदीप जोशी, माजी आ. सुधाकरराव देशमुख, अनिल सोले, शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, मनोहर कुंभार उपस्थित होते.
बुटीबोरीत मदर डेअरीचे ८५० कोटींचे काम
मदर डेअरीचे बुटीबोरी एमआयडीसीमध्ये ८५० कोटींचे काम सुरू झाले आहे. सहास्थितीत २१ हजार लोकांकडून दूध संकलन केले जाते. भविष्यात दूध संकलन ५ लाख लिटरवर नेण्याची योजना आहे. 'धारा' खाद्यतेलाचे उत्पादनदेखील केले जाणार आहे.
४०० नागपुरी साडी
नागपुरातील कपडा उद्योग ही एक शहराची ओळख होती. आता धापेवाडा येथे टेक्सटाइल पार्क उभारला जात आहे. येथे हँडलूमचे काम सुरू झाले आहे. लवकरच पॉवरलूम सुरू होईल. येथे १५०० महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागपूरच्या साडीच्या रूपात कॉटन साडीची बॅण्डिंग केली जाईल. ही नागपुरी साडी ४०० रुपयांत मिळेल.