चिखलात माखलेल्या चिखलापारमध्ये पोहचले उपमुख्यमंत्री; ओल्या दुष्काळाचा दाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 22:54 IST2022-07-19T22:54:00+5:302022-07-19T22:54:34+5:30
Nagpur News अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने चिखलात माखलेल्या चिखलापार येथे मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. काही मिनिटांच्या धावत्या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून घेत आश्वस्त केले.

चिखलात माखलेल्या चिखलापारमध्ये पोहचले उपमुख्यमंत्री; ओल्या दुष्काळाचा दाह
नागपूर : मुसळधार पाऊस व पूरपरिस्थितीने तालुक्यात होत्याचे नव्हते झाले. शेकडो घरात पाणी शिरून मूलभूत गरजांचे बारा वाजले. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने चिखलात माखलेल्या चिखलापार येथे मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. काही मिनिटांच्या धावत्या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून घेत आश्वस्त केले.
रविवारी (दि. १७) रात्रभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे भिवापूर तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. फडणवीस यांनी मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
हिंगणघाट येथून सिर्सीमार्गे चिमुरकडे जाताना त्यांनी चिखलापार येथे ताफा थांबवत, उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती व नुकसानीची माहिती घेतली. यावेळी माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावणकुळे, माजी आ. सुधीर पारवे, भाजप नेते आनंद राऊत उपस्थित होते.
गावाचे पुनर्वसन करा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यथा मांडत मदतीचा हात देण्याची मागणी केली. चिखलापार गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, उमरेड-हिंगणघाट राज्यमार्गावरील चिखलापार गावाजवळ नांद नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे नवीन पूल बांधण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी केशव ब्रम्हे, भाष्कर येंगळे, सतीश चौधरी, अमित राऊत, प्रशांत राऊत, पांडुरंग घरत, गुलाब डहारकर, सुनील जीवतोडे, पुंडलिक बरबटकर, दीपक वाढई, विठोबा लांबट, हिमांशु अग्रवाल, धनंजय चौधरी यांनी केली.