मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला, दंगलीचा कथित सूत्रधार फहीम खानच्या घरावर चालला ‘बुलडोझर’
By योगेश पांडे | Updated: March 24, 2025 11:53 IST2025-03-24T11:52:34+5:302025-03-24T11:53:48+5:30
Nagpur : पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात फहीमच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

The Chief Minister kept his word, a 'bulldozer' drove over the house of Fahim Khan, the alleged mastermind of the riots.
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी महाल, हंसापुरीत झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खानच्या घरावर अखेर नागपूर महानगरपालिका प्रशासनाचा बुलडोझर चालला आहे. यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली होती व मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात फहीमच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नागपुरातदेखील आता गुन्हेगारांवर ‘बुलडोझर’ने वचक बसविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी महाल, हंसापुरी परिसरात झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या घटनेनंतर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानला अटक करण्यात आली होती. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्द्यावरून रविवारी सकाळच्या सुमारास महालच्या शिवाजी पुतळा परिसरात आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर फहीम खानने षडयंत्र रचून जमावाच्या भावना भडकाविल्या व त्यातून जाळपोळ सुरू झाल्याचा त्याच्यावर ठपका आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचादेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजयबाग कॉलनीत त्याने घरात दोन मजल्यांवर ९०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम केले होते. २१ मार्च रोजी मनपाने त्याच्या घरी नोटीस पोहोचवली. हे अतिक्रमण तातडीने पाडण्याची कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आले होते. सोमवारी सकाळीच मनपाचे पथक तेथे पोहोचले व कारवाईला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तदेखील तैनात होता.
उत्तर प्रदेशप्रमाणे नागपुरातदेखील दंगेखोरांच्या घरावर बुलडोझर चालणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता. त्यावर ‘दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. वेळ पडली तर त्यांच्या घरावर बुलडोझर चालविण्यात येईल,’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर महापालिकेने लगेच फहीम खानच्या कुटुंबीयांना अतिक्रमणबाबत नोटीस दिली व कारवाईदेखील केली.