"फिक्सर नेमू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्र्यांना तंबी"
By आनंद डेकाटे | Updated: February 24, 2025 20:06 IST2025-02-24T20:04:38+5:302025-02-24T20:06:43+5:30
Devendra Fadnavis: कुणाला राग आला तरी चालेल पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना खडसावले.

"फिक्सर नेमू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्र्यांना तंबी"
- आनंद डेकाटे
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहित नाही की मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांना नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा फिक्सर लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना खडसावले.
मुख्यमंत्री फडणवीसच आमचे पीए, ओएसडीसुद्धा ठरवतात. त्यामुळे आता आमच्या पण हातात काहीच राहिलेलं नाही, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. त्यामुळे महायुतीमधील मंत्र्यांना काहीच अधिकार नसल्याची चर्चा सुरू झाली. सोमवारी नागपुरात पीएम किसान निधी वाटप कार्यक्रमानंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात विचारणा केली, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरे काय ते सांगितले. ते म्हणाले, मी कॅबिनेटमध्ये सांगितले होते तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण फिक्सर म्हणून ज्यांच्या नावांची चर्चा आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्या नावांना मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाले तरी मी त्याला मान्यता देणार नाही. माझ्याकडे आलेल्या १२५ जणांच्या प्रस्तावापैकी मी १०९ जणांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
काही मंत्र्यांविरोधात असलेल्या तक्रारीबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तक्रार आली म्हणजे काही गैरप्रकार झालाच असेल असे नाही, तरी आलेल्या तक्रारीनुसार चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बोलताना मर्यादा पाळाव्यात
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हव्यात. वीज दरवाढीबाबत जाणीवपूर्वक संभ्रम पसरविला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.