कॅशिअरला जखमी करून लुटली साडेबारा लाखांची रोकड
By योगेश पांडे | Updated: December 4, 2023 20:15 IST2023-12-04T20:14:58+5:302023-12-04T20:15:08+5:30
बॅगेत पैसे असल्याने सुखदेव तरुणाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने सुखदेवच्या डोक्यात काठीने वार केले.

कॅशिअरला जखमी करून लुटली साडेबारा लाखांची रोकड
नागपूर : वाडीतील डिफेन्स क्वार्टर्स परिसराजवळ चोरट्यांनी गॅस एजन्सीच्या कॅशियरला जखमी करून १२.५७ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तीन दिवस आधी घडलेल्या या घटनेने शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे.
अमरावती मार्गावरील डिफेन्स क्वार्टरजवळील तोलानी चौकात एचपी गॅस एजन्सी आहे. तेथे सिद्धार्थ रामचंद्र सुखदेवे (५९) हे मागील ४० वर्षांपासून काम करतात. ते व्यवस्थापक व कॅशिअर अशी दोन्ही कामे सांभाळतात. कंपनीचे तोलानी चौकातील युको बँकेत खाते आहे. एजन्सीच्या वतीने आर्थिक व्यवहार सुखदेव स्वत: करतात. शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने एजन्सीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले होते. बँकेत १२ लाख ५७ हजार रुपये जमा करण्यासाठी सुखदेव सकाळी साडेदहा वाजता दुचाकीवरून कार्यालयातून निघाले. गॅस एजन्सी कार्यालयापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर मागून आलेल्या दोन दुचाकीस्वार तरुणांनी सुखदेव यांना थांबण्याचा इशारा केला.
बॅगेत पैसे असल्याने सुखदेव तरुणाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने सुखदेवच्या डोक्यात काठीने वार केले. सुखदेव दुचाकीसह जमिनीवर पडले. त्यानंतर तरुणांनी सुखदेव यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. अतिशय वेगाने घडलेल्या या घटनेत जखमी सुखदेवने आरडाओरड केली, मात्र गुन्हेगार एका गल्लीतून पळून गेले. सकाळची वेळ असल्याने घटनास्थळी फारच कमी गर्दी होती. जखमी सुखदेव यांनी एजन्सी संचालकांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुखदेवला रुग्णालयात नेण्यात आले. तोलानी चौक संकुलात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.