'जीएसटी' नवीन दरांचा गाजावाजा ? जोपर्यंत 'ही' अडचण आहे, तोपर्यंत वस्तू राहणार महागच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:19 IST2025-09-23T17:18:45+5:302025-09-23T17:19:28+5:30

'जीएसटी'चा सामान्यांच्या खिशाला दिलासा कधी? : नव्या दरावरून ग्राहक आणि लहानमोठ्या दुकानदारांमध्ये संभ्रम

The buzz about new GST rates? As long as 'this' problem exists, things will remain expensive! | 'जीएसटी' नवीन दरांचा गाजावाजा ? जोपर्यंत 'ही' अडचण आहे, तोपर्यंत वस्तू राहणार महागच !

The buzz about new GST rates? As long as 'this' problem exists, things will remain expensive!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सरकारने २२ सप्टेंबरपासून काही वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा परिणाम त्वरित दिसणार नाही. कारण बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेला जुना माल हा आधीच्या दरांनुसारच विकला जाणार आहे. जोवर जुना माल संपत नाही, तोवर स्वस्ताई नाहीच.

ग्राहकांना जीएसटी कपातीचा खरा फायदा ऑक्टोबरपासून मिळेल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. सोमवारी लोकमत प्रतिनिधीने शहरातील प्रमुख बाजारपेठांचा आढावा घेतला असता उपरोक्त वस्तुस्थिती पुढे आली. सध्या बाजारात दरकपातीचा गोंधळ आणि संभ्रम दिसून येत आहे.

नव्या दराच्या अंमलबजावणीवर भर

नंदनवन भागातील किराणा स्टोअर्सचे संचालक म्हणाले, सध्या लहान दुकानदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे ग्राहक नव्या जीएसटी दरांनुसार कपात झालेल्या किमतीत वस्तू मागत आहेत, तर दुसरीकडे बन्याच व्यापाऱ्यांकडे आधीच्या दरात खरेदी केलेला स्टॉक असल्याने त्वरित सवलत देणे त्यांच्यासाठी शक्य नाही. नव्या दरांची अंमलबजावणी ही केवळ नवीन मालाच्या खरेदीयर होईल. तोवर ग्राहकांनी आणि लहान दुकानदारांनी संयम ठेवणे आवश्यक असल्याचे नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

नवीन माल बाजारात येताच ग्राहकांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल. परंतु, जुना माल संपेपर्यंत जीएसटी कपात झालेल्या वस्तूंच्या दरात फरक दिसणार नाही. सरकारने घोषणेनंतर एक महिन्याचा कालावधी द्यायला हवा होता, असे व्यापारी म्हणाले. ग्राहक आणि मॉल व्यवस्थापन व लहानमोठ्या दरकपातीबाबत दुकानदारांमध्ये वादविवाद वाढले आहेत. स्थानिक पातळीवरील दुकानदारांना त्वरित दर बदलणे शक्य नाही. त्यामुळे ग्राहकांना कर कपातीचा परिणाम उशिरा दिसून येईल, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनीही उत्पादन तारीख पाहून वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन ग्राहक संघटनांनी केले आहे.

मोठ्या मॉलमध्ये बिलिंगची सेंट्रलाईज सिस्टीम

मोठ्या मॉलमध्ये सेंट्रलाईज्ड बिलिंग सिस्टीममुळे ग्राहकांना जीएसटी कपातीचा प्रत्यक्ष फायदा मिळत असल्याचे दिसून आले. या प्रणालीमध्ये देशभरातील सर्व शाखांमधील बिलिंग एकाच केंद्रातून नियंत्रित केले जाते. त्यामुळे एखाद्या शहरात जुना स्टॉक असो वा नसो, बिलिंग मात्र नव्या दरांनुसार केले जात असल्याचे नंदनवन, श्रीकृष्णनगर भागातील एका मॉलची पाहणी केल्यानंतर दिसून आले.

वस्तूंवरील जीएसटी बचत :

वस्तू                      जुनी किंमत            नवी किंमत
लोणी (५०० ग्रॅम)         ३०५                     २८६
पनीर (५०० ग्रॅम)          १८०                     १६८
चीज (किलो)                ६३०                     ६०५
तूप (किलो)                 ६५०                     ६११
बदाम                          ८५०                     ७९९
चॉकलेट                      ११०                      १०४
बिस्कीट                      १००                       ९४
टोमॅटो केचप (कि.)     १५०                      १४१
जाम (अर्धा कि.)         २००                      १८८
आइस्क्रीम                   १८०                      १६०
हेअर ऑइल                ६८                        ६१
शॉम्पू                          १४९                      १३३
टॅल्कम पावडर            १९९                     १७७
फेस पावडर                ३७०                     ३२९

"दुकानात नवीन आणि बराच जुना माल आहे. सध्या विक्रीच्या आवश्यकतेनुसार मालाची ऑर्डर देत आहे. ग्राहकांना कर कपातीचा फायदा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही यंत्रणा सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागतील."
- संजय टुले, किराणा विक्रेते.

"नंदनवन, श्रीकृष्णनगर येथील डी-मार्टमध्ये खरेदी केली. कमी झालेल्या काही वस्तूंवरील जीएसटीसंदर्भात येथील कर्मचारी माझे समाधान करू शकले नाहीत. बिल आणि कमी झालेल्या कराची शहानिशा करून काही अयोग्य आढळल्यास तक्रार दाखल करू"
- अमिताभ ओबेरॉय, ग्राहक.

"जीएसटी कपात जाहीर झाली असली तरी ग्राहकांना प्रत्यक्ष दिलासा मिळविण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. नवीन माल बाजारात येताच दरकपातीचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांना मिळेल. तोपर्यंत ग्राहकांनी संयम ठेवावा."
- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा संघ.

Web Title: The buzz about new GST rates? As long as 'this' problem exists, things will remain expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.