ऑटोचालक की सैतान? मतिमंद तरुणीचे अपहरण करून अत्याचार
By योगेश पांडे | Updated: March 1, 2023 17:21 IST2023-03-01T17:20:43+5:302023-03-01T17:21:28+5:30
Nagpur News एका ऑटोचालकाने मतिमंद तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ऑटोचालक की सैतान? मतिमंद तरुणीचे अपहरण करून अत्याचार
योगेश पांडे
नागपूर : एका ऑटोचालकाने मतिमंद तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुकेश सुधाकर हेजीब (४०, गोंदिया), असे ऑटोचालकाचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत संबंधित तरुणी राहते. २५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ती घराजवळील दुकानात चॉकलेट आणायला गेली. मात्र, बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला व दुसऱ्या दिवशी अजनी पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. यादरम्यान त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ती मुलगी घरी परत आली. तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केली असता अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच राहणारा ऑटोचालक मुकेशने तिला ऑटोत बसवून नेल्याचे तिने सांगितले. तिला आणखी सखोल विचारले असता त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची बाब समोर आली. त्याने याअगोदरदेखील असेच संतापजनक कृत्य केल्याची माहिती तिने दिली. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालील जमीनच सरकली. तिच्या आईने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली व ऑटोचालकाविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशी सुरू आहे.