ओळखीतून घडणार होता घात, पण प्रसंगावधानाने केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 21:45 IST2022-07-25T21:45:10+5:302022-07-25T21:45:34+5:30
Nagpur News बळजबरीच्या उद्देशाने मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. वाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

ओळखीतून घडणार होता घात, पण प्रसंगावधानाने केली मात
नागपूर : बळजबरीच्या उद्देशाने मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. वाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. संदीप पंजाबराव रंगारी (३५) व मिलिंद विजय निकोसे (३४, रा. म्हाडा कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
२६ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. घरापासून दूर असल्याने तिने कंपनीजवळ भाड्याने खोली घेतली आहे. रविवारी सुट्टी असल्याने मुलगी आईला भेटण्यासाठी वाडीत आली होती. रात्री साडेआठ वाजता आईच्या घरातून खोलीकडे जात असताना तिला वाटेत आरोपी भेटले. संदीप हा मुलीच्या घराजवळ राहतो. त्याने मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसण्यास सांगितले. ओळख असल्याने तरुणी संदीपच्या दुचाकीवर गेली. तिची खोली मागे सुटल्याने मुलीने दोघांना ‘कुठे नेत आहात’ असे विचारले. यानंतर ‘काही काम आहे’ असे म्हणत आरोपींनी दुचाकी पुढे घेतली.
संदीप मुलीला घेऊन एका घरात गेला. ‘मित्राशी काम आहे’ असे म्हणत संदीपने मुलीला खोलीत नेले. दरवाजा बंद होताच काहीतरी अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यतेने मुलगी सावध झाली. आरडाओरड करत ती खोलीतून बाहेर आली. तिने वाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.