रेल्वे स्थानकावरील ते बेवारस दृष्टीहीन बाळ जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणार
By आनंद डेकाटे | Updated: August 11, 2025 20:26 IST2025-08-11T20:25:18+5:302025-08-11T20:26:24+5:30
बेवारस, दृष्टिहीन माला पापळकर हिची प्रेरणादायी कहानी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रियेला सुरूवात

That orphaned blind child at the railway station will join the District Collector's Office
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीच एक बाळ रडत होतं. कुणाचं तरी ‘नकोसं’ झालेलं एक छोटंसं जीवंत अस्तित्व. डोळ्यात प्रकाश नव्हता, शरीर अत्यंत अशक्त… पण त्या क्षणी सुरू झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा. माला शंकरबाबा पापळकर यांची. त्या अंधारात जन्मलेली माला आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक पदावर रुजू होणार आहे. एका बेवारस, दृष्टिहीन मुलीचं हे यश केवळ तिच्या जिद्दीमुळे, परिश्रमामुळे आणि माणुसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळे पूर्ण होऊ शकलं.
मालाला अमरावतीच्या वझ्झर येथील दिव्यांग बेवारस बालगृहात आणण्यात आलं. जिथे तिच्या जीवनात प्रकाश झाला तो म्हणजे पद्मश्री कर्मयोगी शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे. त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. तिचं नाव ‘माला’ ठेवलं आणि तिला केवळ आश्रयच नाही, तर ‘ओळख’ दिली. शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड, आणि शंकरबाबांचा आधार यामुळे माला शिकत गेली. ब्रेल लिपीतून दहावी, बारावी, पदवी… आणि पदव्युत्तर शिक्षणही.
जगण्यातली प्रत्येक पायरी मालेसाठी परीक्षा होती. ना जन्मदाते होते, ना डोळ्यांचा प्रकाश. पण अंगात होती ती अपराजेय इच्छाशक्ती. अपंगत्वाच्या मर्यादा झुगारून तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१९ पासून तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात केली. तर २०२३ मध्ये तिने एमपीएससी 'ग्रुप सी' मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हापासून ती नियुक्तीच्या प्रतीक्षेत होती. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून तिची नियुक्ती होणार आहे. तिच्यासोबतच एकूण ५४ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रीया सोमवारपासून सुरू झाली. सोमवारी डाक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आले. स्वत: शंकरबाबा पापाळकर सुद्धा तिच्यासोबत होते. येत्या काही दिवसात मालाला नियुक्तीपत्र दिले जाईल.
सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना : पद्मश्री शंकरबाबा पापळकर
यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर म्हणाले, जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे ती सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना आहे. आज आवश्यक प्रमाणपत्रांच्या व्हेरिफिकेशन झाली बोलावण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी प्रक्रिया पार पाडताना आमची आस्थेने काळजी घेतली. स्वत: जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी आमच्याशी संवाद साधला. मालाचे कौतुक केले. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मालाला नियुक्तीपत्र दिले जाईल, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यंनी बोलून दाखवल्याचे पापळकर यांनी सांगितले.