शशिकला ठाकरे हत्याकांडाचा उलगडा
By Admin | Updated: September 28, 2016 03:27 IST2016-09-28T03:27:24+5:302016-09-28T03:27:24+5:30
सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर राहणाऱ्या शशिकला नाशिकराव ठाकरे (वय ६५) यांच्या हत्याकांडाचा उलगडा करून दोनपैकी एका आरोपीच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले.

शशिकला ठाकरे हत्याकांडाचा उलगडा
मजुरांची मती फिरली : लुटमारीच्या उद्देशाने हत्या
नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर राहणाऱ्या शशिकला नाशिकराव ठाकरे (वय ६५) यांच्या हत्याकांडाचा उलगडा करून दोनपैकी एका आरोपीच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. कोणतेही कट कारस्थान नसताना केवळ ऐनवेळी मालामाल होण्याची लालसा जागल्यामुळे रोजमजुरी करणाऱ्या आरोपींनी शशिकला यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सक्करदरा पोलीस ठाण्यासमोरच्या ओमनगरात शशिकला ठाकरे यांची इमारत आहे. प्राध्यापक मुलगा, सून, मुलाची मुलगी अन् मुलगी-जावयांसह त्यांची दोन मुले अशा भरलेल्या परिवाराच्या धनी असलेल्या शशिकला सोमवारी दिवसभर एकट्या होत्या. त्यांचा मुलगा, सून आणि नातू नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळा-महाविद्यालयात गेले होते. काही दिवसांपूर्वी घराचे बांधकाम केल्यामुळे घरासमोर रेती-गिट्टी अस्तव्यस्त पडून होती. ती उचलून ठेवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर मजुरी करणाऱ्या दोघांना घरी बोलविले होते. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत दिसत होता. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांचे नातू शाळेतून परतले. त्यांनी आतमध्ये बघितल्यानंतर त्यांना आजी शशिकला रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्या. आजीची अवस्था पाहून त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे कुणाल विजय चांदेकर आणि अन्य शेजारी गोळा झाले. त्यांनी सक्करदरा पोलिसांना हत्या झाल्याचे कळविले. त्यामुळे सक्करदरा ठाण्यातील पोलीस धावले. ठाण्यासमोरच हत्या झाल्याचे कळाल्याने गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ चारचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञांचे पथक, गुन्हेशाखेच्या पथकांसह आजूबाजूच्या ठाण्यातील पोलिसांनाही घटनास्थळी बोलवून घेण्यात आले. (प्रतिनिधी)
सीसीटीव्हीने दिला तपासाचा धागा
पोलिसांनी इमारतीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात दुपारी १.४५ वाजता शशिकला एका शेजारणीशी बोलताना दिसल्या. नंतर त्यांच्यासोबत सीसीटीव्हीत दोन रेती गिट्टीचे काम करणारे मजूर दिसले. घटनेच्या वेळेपासून ते बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांनी ‘त्या’ दोघांचा शोध सुरू केला. यातील एक गोंदियाचा तर दुसरा हुडकेश्वरमधील रहिवासी असल्याचे कळाल्याने पोलीस लगेच त्यांच्या घरी पोहचले. एका शिवा नामक मजुराच्या पत्नीने तो प्रवीणसोबत भंडारा, गोंदियाकडे गेल्याची माहिती देताच गुन्हे शाखेची पथके तिकडे रवाना झाली. मंगळवारी दिवसभर शोधाशोध केल्यानंतर एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याला नागपुरात आणण्यात आले. दुसरा आरोपी मिळायचा असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे टाळले.
दयाळू वृत्तीने केला घात
सूत्रांच्या माहितीनुसार, रेती गिट्टी उचलण्यासाठी दुपारी १.४५ वाजता शशिकला यांनी शेजारच्या व्यक्तीकडून फावडे मागून घेतले होते. रेती-गिट्टी पोत्यात भरून ठेवल्यानंतर थकलेल्या मजुरांची त्यांना दया आली. त्यांनी या दोघांना चहासाठी घरात बोलविले. मजुरांना पाणी दिल्यावर चहा करताना घरातील बडेजावपणा पाहून मजुरांची मती फिरली. येथे वृद्ध शशिकला एकट्याच आहेत, मोठा माल मिळू शकतो, असा समज झाल्याने या दोघांनी त्यांचे तोंड दाबून मौल्यवान ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थितीशी संघर्ष करीत आलेल्या शशिकला यांनी या दोघांचाही प्रतिकार सुरू केला. त्यामुळे आरोपीने एका जाडसर वस्तू त्यांच्या डोक्यावर मारली. त्या आरडाओरड करीत असल्याचे पाहून एकाने किचनच्या ओट्यावरील कैची उचलून शशिकला यांच्या गळ्यात भोसकली. त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपींनी घाईगडबडीत कपाटाची, लॉकरची तपासणी केली. आतमध्येच लाखोंचे दागिने होते. मात्र, आरोपी गोंधळल्यामुळे त्यांना ते दिसलेच नाही. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केल्यानंतर ते पळून गेले. मात्र... सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेत पोलिसांनी २४ तासातच एकाच्या मुसक्या बांधल्या.