दहा हजारावर विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:34+5:302021-03-04T04:12:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील पहिली ते चौथ्या वर्गातील ...

दहा हजारावर विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील पहिली ते चौथ्या वर्गातील विद्यार्थिनींना दिला जाणारा वार्षिक २२० रुपये भत्ता कोरोनाचे कारण सांगून बंद करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील तब्बल दहा हजारावर विद्यार्थिनींना याचा फटका बसला आहे.
भटके व विमुक्त जमातातील विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती फारच कमी आहे. ती वाढावी, त्यांनाही शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने राज्य शासनाने पहिली ते चौथ्या वर्गातील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्याची योजना आखली. परंतु सध्या ही योजना बंद आहे. २२ फेब्रुवारी रोजी प्राथमिक शिक्षण संचालकांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढून माहिती दिली. यात गेल्या वर्षी कोरोनामुळे संपूर्ण शाळा बंद राहिल्या. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थी शाळेतच जात नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना देण्यात येणारा उपस्थिती भत्ता बंद करण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यात अशा जवळपास दहा हजारावर विद्यार्थिनी आहेत. त्यांना याचा फटका बसला आहे.
बॉक्स
दिवसाला एक रुपया तोही बंद
भटके व विमुक्त जमात ही अतिशय गरीब आहे. यातील मुलेच फारसे शिकत नाही तर मुली कुठून शिकणार. या समाजातील मुली शिकाव्यात. त्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठवावे. त्यांनाही शाळेत यायची इच्छा व्हावी, या उद्देशाने सरकारने ही योजना आणली. या योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थिनीला दिवसाला केवळ एक रुपया मिळत होता. त्याचे किंचितसे परिणाम दिसूनही आले. पालक किमान आपल्या मुलींना शाळेत पाठवू लागले. शासनाने आता तो एक रुपयाही देणे बंद केल्याने त्याचा फटका निश्चितच बसला आहे.
बॉक्स
कोरोनामुळे नव्हे तर अनेक वर्षांपासूनच बंद
भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थिनींना मिळणारा उपस्थिती भत्ता नाममात्र आहे. मात्र त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत पाठविले जात होते. हा भत्ता कोरोना काळात नव्हे तर खूप वर्षांपासून दिलाच जात नाही. या विद्यार्थिनींना शाळेत जाता यावे म्हणून हा भत्ता शासनाने तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
दीनानाथ वाघमारे, ज्येष्ठ कार्यकर्ते