तेंदूपत्ता तोडाईला जाताय, एकत्रित जा! वनविभागाने जारी केल्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:52 PM2020-04-23T23:52:25+5:302020-04-23T23:53:37+5:30

तेंदूपत्ता तोडाईचा आणि मोहफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Tendu leaves are piked up, go together! Instructions issued by the Forest Department | तेंदूपत्ता तोडाईला जाताय, एकत्रित जा! वनविभागाने जारी केल्या सूचना 

तेंदूपत्ता तोडाईला जाताय, एकत्रित जा! वनविभागाने जारी केल्या सूचना 

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तेंदूपत्ता तोडाईचा आणि मोहफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. तेंदूपत्ता तोडाईला जाताना मिळून जा, अशी दवंडी गावात देऊन गावकऱ्यांना जागृत केले जात आहे.
नागपूर वन विभागांतर्गत एकूण १४ वनपरिक्षेत्र येतात. हे वनक्षेत्र सुमारे १ लाख ४६ हजार हेक्टरचे आहे. या वनक्षेत्राची सीमा पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, बोर अभयारण्य, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे सेमिनरी हिल्स, नागपूर वनपरिक्षेत्र वगळता इतर १३ वनपरिक्षेत्र वन्यजीवांचे कॉरिडोर आहेत.
नागपूर जिल्ह्यातील ५५० गावे ही वनालगत आहेत. त्यामुळे या गावकºयांची उपजीविका वनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रात मोहफुले किंवा तेंदूपत्ता संकलनासाठी जातात. वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावकऱ्यांना सकाळी लवकर जंगलामध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी जंगलामध्ये जाताना कमीतकमी १० व्यक्तींनी एकत्र जावे. तेंदूपाने तोडताना तसेच मोहफुले वेचताना बराच वेळ वाकून राहू नये. दोन-तीन व्यक्तींनी एकत्र येऊन काम करावे, एकमेकांशी सारखे बोलत राहावे. काम करताना वाकल्यास वन्यप्राण्यांना तो प्राणी वाटतो व ते हल्ला करू शकतात, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात येत आहेत. वनात डोक्यामागे मुखवटा घालून चालावे, खांद्यावर जमिनीस समांतर काठी घेऊन चालावे, असे उपाय सुचविण्यात येत आहेत.

जागरूकतेसाठी उपाययोजना
वन परिक्षेत्रस्तरावर गावकऱ्यांना जागरूक केले जात आहे. यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीची मदत घेतली जात असून कोरोनासंदर्भात शासनाकडून जारी सूचनांचे उल्लंघन न करता ग्रामस्थांना याबाबत सतर्क केले जात आहे. संपर्क टाळण्याकरिता क्षेत्रीय कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून या सूचना गावात पोहचविल्या जात आहेत.

गावकऱ्यांच्या डोअर-टु-डोअर कॅम्पेनिंगद्वारे २५ हजार कुटुंबांना मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत सांगण्यात आले आहे. जंगलालगतच्या गावकऱ्यांच्या जागृतीसाठी ग्रामपंचायती आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सहकार्य घेतले जात आहे.
- डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग

Web Title: Tendu leaves are piked up, go together! Instructions issued by the Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.