दहा दिवसापूर्वीच डाॅ. शीतल आमटेंनी बदलला मोबाईलचा पासवर्ड-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:47+5:302020-12-04T04:23:47+5:30

पासवर्ड आहे ‘डोळे’ : पासवर्ड काढण्यासाठी मोबाईल व लॅपटाॅप मुंबईला राजेश भाेजेकर चंद्रपूर : आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ ...

Ten days ago, Dr. Sheetal Amte changes mobile password- | दहा दिवसापूर्वीच डाॅ. शीतल आमटेंनी बदलला मोबाईलचा पासवर्ड-

दहा दिवसापूर्वीच डाॅ. शीतल आमटेंनी बदलला मोबाईलचा पासवर्ड-

पासवर्ड आहे ‘डोळे’ : पासवर्ड काढण्यासाठी मोबाईल व लॅपटाॅप मुंबईला

राजेश भाेजेकर

चंद्रपूर : आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे आत्महत्या वा घातपात आहे, ही बाब अद्याप स्पष्ट झाली नसली तरी डाॅ. शीतल यांनी आठ-दहा दिवसांपूर्वीच आपल्या मोबाईल, टॅब व लॅपटाॅपचे पासवर्ड बदलले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

डाॅ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांनाही हे पासवर्ड माहीत नाहीत. ही बाब सेलच्या तपासात पुढे आल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी ‌‘लोकमत’ला दिली. नागपूर सायबर सेललाही ते पासवर्ड उघडता न आल्याने लॅपटाॅप आणि मोबाईल मुंबईला पाठविण्यात आला.

उल्लेखनीय, डाॅ. शीतल यांच्या दोन मोबाईलपैकी एक मोबाईल ॲपल कंपनीचा आहे. या मोबाईलला डाॅ. शीतल यांनी स्वत:चे ‘डोळे’ पासवर्ड ठेवले आहे. जोपर्यंत मोबाईलचे स्क्रीन डाॅ. शीतल यांचे डोळे ‘स्कॅन’ करणार नाहीत तोपर्यंत हा मोबाईल उघडणार नाही. हा पासवर्ड तोडण्यासाठी चंद्रपूर सायबरचे प्रयत्न निष्फळ ठरले.

बाॅक्स

डाॅ. शीतलचा मोबाईल बोलणार

डाॅ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असावी, या बाबीचा अद्याप उलगडा झालेला नाही. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौफेर चौकशी केली तरी काहीही हाती लागले नाही. महत्त्वाचा पुरावा म्हणून पोलीस मोबाईल, टॅब व लॅपटाॅपकडे बघत आहेत. येथेही पासवर्डचा व्यत्यय आला आहे. त्यात काय दडले आहे, याची पोलिसांना प्रतीक्षा आहे.

डाॅ. शीतल यांची खोली गौतम करजगींच्या हवाली

डाॅ. शीतल आमटे ज्या खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. पोलिसांनी तपास पूर्ण करून ही खोली डाॅ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांच्या हवाली केली आहे.

मृत्यूचा शोध घेणारे काही धागेदोरे गवसल्याचे पोलीस सूत्र सांगत असले तरी यामागील नेमक्या कारणांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. पोलिसही त्या दिशेने तपास करीत असल्याची माहिती आहे.

फाॅरेन्सिक लॅबला एसीपींचे खास पत्र

प्राथमिक पोस्टमार्टेम रिपोर्टमधून काहीही निष्पन्न झाले नाही. फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा अहवाल जलदगतीने प्राप्त व्हावा, यासाठी स्वत: पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नागपूरच्या फाॅरेन्सिक लॅबला खास पत्र पाठवून अहवाल लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केल्याचे समजते.

करजगी कुटुंबीयांचे बयाण नोंदविले

वरोरा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत गौतम करजगी, सासू सुहासिनी करजगी, सासरे शिरीष करजगी यांच्यासह नोकरांचे बयाण नोंदविले. डाॅ. शीतल यांच्या मृत्यूवर आमटे कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनी आनंदवनातील काही लोकांची चौकशी केली. आमटे कुटुंबीय प्रचंड धक्क्यात असल्यामुळे त्यांचे बयाण नोंदविले नव्हते. परंतु, प्रकरण रहस्यमय बनल्याने पोलीस आमटे कुटुंबीयांचे बयाण नोंदविणार आहेत.

Web Title: Ten days ago, Dr. Sheetal Amte changes mobile password-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.