मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक समीर पालतेवार यांना तात्पुरता जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:33 IST2019-02-07T21:29:25+5:302019-02-07T21:33:13+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार यांना फसवणूक प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. प्रकरणावर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक समीर पालतेवार यांना तात्पुरता जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार यांना फसवणूक प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. प्रकरणावर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
पालतेवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सीताबर्डी पोलिसांनी गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालन तक्रारकर्ते चक्करवार, पालतेवार व इतरांद्वारे करण्यात येते. चक्करवार यांनी पालतेवार, विशाल मुत्तेमवार आदींच्या मदतीने २००६ मध्ये व्हीआरजी हेल्थ केअर सुरू केले होते. २०१२ मध्ये मुत्तेमवार व अन्य काही लोक वेगळे झाल्यानंतर मेडिट्रिना हॉस्पिटल सुरू करण्यात आले. पोलीस तक्रारीनुसार, पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये मोठा घोटाळा केला आहे. पालतेवार यांनी बनावट व्हाऊचरद्वारे हॉस्पिटलच्या खात्यातील मोठी रक्कम परस्पर काढून घेतली. या व्यवहाराचा कुठलाही हिशेब त्यांनी ठेवला नाही. पालतेवार यांच्यावर याशिवायही विविध आरोप आहेत. पालतेवार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर व वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, चक्करवार यांच्यातर्फे अॅड. श्याम देवानी तर, सरकारतर्फे अॅड. तृप्ती उदेशी यांनी कामकाज पाहिले.