लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :विदर्भातील उन्हाळ्याची दाहकता सर्वांनाच परिचित आहे, मात्र यंदा मार्चच्या मध्यावरच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. सकाळपासूनच अंगाची लाहीलाही करणारे उन्हाचे चटके पाहता, येत्या काही दिवसांतच जिल्ह्याचा पारा ४० अंशांचा टप्पा ओलांडणार हे निश्चित झाले आहे. या वाढत्या तापमानामुळे 'उष्माघाताचा' धोका कैकपटीने वाढला आहे. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये 'उष्माघात उपचार कक्ष' सज्ज होत असली, तरी नागरिकांनी आतापासूनच 'अलर्ट मोड'वर राहावे आणि उन्हाचा थेट सामना टाळावा, असा सक्त सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्ष
शहर व ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज केला जात आहे. या संदर्भात नुकतेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सूचना केल्या आहेत. मेया व मेडिकलमध्ये १० खाटांचे, तर आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये पाच खाटांचे उष्माघात कक्ष या आठवड्यात रुग्णसेवेत सुरू होणार आहेत.
तापमान ३९ अंशांवर, उष्णतेच्या लाटेचा इशारा
मार्चच्या मध्यावरच जिल्ह्याचा पारा ३९ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. आगामी काळात तापमान ४२ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील संभाव्य 'उष्णतेच्या लाटेचा' इशारा पाहता, आरोग्य यंत्रणेने आतापासूनच सज्ज राहणे अत्यंत गरजेचे आहे.
उष्माघातापासून बचावासाठी काय कराल
- सैल कपडे घाला.
- उन्हात जाताना संपूर्ण डोके झाकेल अशी टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
- गॉगल्सचा वापर करा.
- द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करा.
- उन्हात असलेल्या वाहनामध्ये कुणाला ठेवू नका.
- उन्हामध्ये व्यायाम करू नका.
- कष्टाची कामे करू नका.
कोणाला धोका होऊ शकतो ?
उष्माघाता कोणालाही होऊ शकतो. परंतु, चार वर्षांपेक्षा छोट्या मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना हा आजार धोकादायक ठरू शकतो. कारण छोट्या मुलांमध्ये शरीराचे तापमान सामान्य करण्याची क्षमता विकसित झालेली नसते तर ज्येष्ठांमध्ये औषधे आणि विविध आजारांमुळे उष्णता सहन करण्याची आणि शरीराला त्यानुरूप तयार करण्याची प्रक्रिया कमजोर पडलेली असते.
उष्माघाताची लक्षणे काय ?
- शरीराचे तापमान अचानक खूप वाढणे (१०४ फॅरेनहाइटपेक्षा जास्त).
- घाम न येणे आणि त्वचा लाल, उष्ण व कोरडी पडणे.
- तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मळमळणे.
- हृदयाचे ठोके वेगाने पडणे
- गोंधळल्यासारखे वाटणे, शुद्ध हरपणे किंवा झटके येणे.
"'हीट एग्जशन'वर उपचार न केल्यास उष्माघाताचे कारण ठरू शकते. जे धोकादायक ठरते. उष्माघातामध्ये तातडीच्या उपचाराची गरज पडते. यामध्ये मेंदू आणि शरीराचे अन्य महत्त्वपूर्ण अवयवांना नुकसान होऊ शकते. उष्माघातामध्ये शरीराचे तापमान १०४ डिग्री फारेनाहाइट, ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जाते. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार घेणे आवश्यक असते."- डॉ. आर. जी. चांडक, क्रिटिकल केअर तज्ज्ञ.
Web Summary : Vidarbha faces scorching heat, with temperatures nearing 40°C. Heatstroke risk rises, especially for young children and the elderly. Hospitals prepare heatstroke wards. Stay hydrated, wear loose clothing, and avoid strenuous activity outdoors to stay safe.
Web Summary : विदर्भ में भीषण गर्मी, तापमान 40 डिग्री सेल्सियस के करीब। लू लगने का खतरा बढ़ा, खासकर बच्चों और बुजुर्गों के लिए। अस्पताल लू वार्ड तैयार करते हैं। सुरक्षित रहने के लिए हाइड्रेटेड रहें, ढीले कपड़े पहनें और बाहर ज़ोरदार गतिविधि से बचें।