पुरणचंद्र मेश्रामांना तात्पुरता दिलासा
By Admin | Updated: March 14, 2015 02:43 IST2015-03-14T02:43:23+5:302015-03-14T02:43:23+5:30
डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे.

पुरणचंद्र मेश्रामांना तात्पुरता दिलासा
नागपूर : डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व चंद्रकांत भडंग यांनी शुक्रवारी संबंधित रिट याचिका प्रलंबित असेपर्यंत मेश्राम यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारीपदावर कायम ठेवण्याचे आणि या पदाचे सर्व लाभ देण्याचे निर्देश दिलेत.
मेश्राम यांची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आली आहे. त्यांची पुनर्नियुक्ती ३० मे २०१४ पासून ग्राह्य धरण्यात यावी असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ७ जुलै २०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मेश्राम यांची पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार या प्रस्तावाचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु, १२ आॅक्टोबर २०१४ रोजी कुलपतींनी त्यांना निवड प्रक्रियेतून जाण्याचे आदेश दिलेत. यानंतर ६ डिसेंबर २०१४ रोजी वित्त व लेखाधिकारीपदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याविरुद्ध मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या प्रस्तावानुसार २९ मे २०१९ पर्यंत पदावर कायम ठेवावे अशी त्यांची विनंती आहे. (प्रतिनिधी)