मोबाइल, संगणकामुळे आटत आहेत डोळ्यातील अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 10:43 AM2018-04-23T10:43:23+5:302018-04-23T11:17:16+5:30

मोबाइल, संगणक, लॅपटॉपचा परिणाम डोळ्यावर होत आहे. डोळे ‘ड्राय’ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Tears reduced due to Mobile and computer | मोबाइल, संगणकामुळे आटत आहेत डोळ्यातील अश्रू

मोबाइल, संगणकामुळे आटत आहेत डोळ्यातील अश्रू

googlenewsNext
ठळक मुद्देजे लोक संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलचा खूप जास्त वापर करतात, त्यांनी दहा मिनिटांमध्ये एका मिनिटासाठी डोळे मिटावे. परंतु जोरात डोळे मिटू नये.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकजण मोबाईल, संगणक, लॅपटॉपवर खूप जास्त वेळ घालवितात. याचा परिणाम डोळ्यावर होत आहे. डोळे ‘ड्राय’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण साधारण दर मिनिटाला ३० वेळा पापण्या लवतो. परंतु जेव्हा आपण या ‘गॅजेट’वर एखादा व्हिडिओ, चित्रपट किंवा चित्रे पाहतो तेव्हा पापण्या लवण्याचे प्रमाण १०-१२ वेळापर्यंतच होते. परिणामी, डोळ्यात अश्रू तयार करणाऱ्या कार्यावर याचा प्रभाव पडतो. डोळ्यातील अश्रू हवेतील वातावरणामुळे आटतात. परिणामी, कृत्रिम अश्रूची म्हणजे ‘आय ड्रॉप’ची गरज पडते. काहींना आयुष्यभर या ड्रॉपची गरज पडू शकते, अशी माहिती आॅल इंडिया आॅप्थलमोलॉजी सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. कुरेश मस्कटी यांनी दिली.
आॅप्थलमोलॉजिकल सोसायटी नागपूरचा (ओएसएन) पदग्रहण सोहळा रविवारी थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मस्कटी तर विशेष अतिथी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे उपस्थित होते. 

मधुमेहाचे ५० टक्के रुग्ण दृष्टी अधू झाल्यावरच येतात
भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु अजूनही हवी त्या प्रमाणात जनजागृती नसल्याने मधुमेहाचे ५० टक्के रुग्ण दृष्टी अधू झाल्यावर किंवा अंधत्व आल्यावरच डॉक्टरांकडे येतात. विशेषत: मधुमेहामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतरही डोळ्यात पुन्हा रक्तस्राव होण्याची शक्यता असते. कारण, डोळ्याच्या नसा फार पातळ झालेल्या असतात. वारंवार शस्त्रक्रियाही अनेकांसाठी परडवणाऱ्या नसतात. यामुळे मधुमेहाचे निदान होताच नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मधुमेहीने वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. मस्कटी यांनी दिला.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चष्मा टाळता येतो
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान कृत्रिम नेत्रभिंग (इंट्रॉक्युलर लेन्स) टाकले जाते. आता यात अद्यावत ‘लेन्स’ही उपलब्ध होऊ लागले आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना जवळचे किंवा दूरचे दृष्टिदोष असायचे त्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर चष्मे वापरावे लागायचे. परंतु आता असे काही लेन्स उपलब्ध झाले आहेत ज्यामुळे चष्म्याची गरजच पडत नाही. ‘रेटीना’च्या रुग्णांसाठी अनेक नवे इंजेक्शन उपलब्ध झाल्याने अंधत्वाला प्रतिबंध घालणे शक्य झाले आहे, असेही डॉ. मस्कटी म्हणाले.

एका बुबुळाचे दोघांमध्ये प्रत्यारोपण शक्य
डॉ. मस्कटी म्हणाले, नेत्रदानातून मिळणाऱ्या एका बुबुळाचे प्रत्यारोपण एकाच रुग्णामध्ये होते. परंतु आता ज्या रुग्णांमध्ये बुबुळ प्रत्यारोपण करायचे असेल आणि त्या रुग्णाच्या बुबुळाच्या आतील भागात दुखापत झाली असेल तर तेवढाच भाग बदलविला जातो, किंवा ज्या रुग्णाचा बाहेरच्या भागात दुखापत झाली असेल तर तेवढाचा भाग बदलविण्यात येतो. यामुळे एका बुबुळाचा दोन रुग्णांमध्ये वापर होऊ शकतो. हे एक नवीन तंत्रज्ञान समोर आले आहे. याचा फायदा अंधत्व निवारण मोहिमेला होणार आहे.

Web Title: Tears reduced due to Mobile and computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.