शिक्षकांच्या बदल्या : पती-पत्नीतील अंतर झाले २१२ किमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:47 IST2018-06-23T16:44:09+5:302018-06-23T16:47:53+5:30
शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन केल्या. बदल्यांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप झाला नसल्याने ह्या बदल्या पारदर्शक झाल्याचे शासन सांगते. परंतु या बदल्यामुळे अनेक शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या आहे. पतीपत्नी एकत्रीकरणाच्या निकषात अनेक दाम्पत्यांचे विभक्तीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शिक्षक बदली शाळेत रुजू झाले आहे. परंतु शिक्षकांची मानसिकता गोठावली आहे. खरचं या बदल्या पारदर्शक की अन्यायकारक असा सवाल आता शिक्षकांकडून होत आहे.

शिक्षकांच्या बदल्या : पती-पत्नीतील अंतर झाले २१२ किमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन केल्या. बदल्यांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप झाला नसल्याने ह्या बदल्या पारदर्शक झाल्याचे शासन सांगते. परंतु या बदल्यामुळे अनेक शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या आहे. पतीपत्नी एकत्रीकरणाच्या निकषात अनेक दाम्पत्यांचे विभक्तीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शिक्षक बदली शाळेत रुजू झाले आहे. परंतु शिक्षकांची मानसिकता गोठावली आहे. खरचं या बदल्या पारदर्शक की अन्यायकारक असा सवाल आता शिक्षकांकडून होत आहे.
जि.प.चे शिक्षक शुद्धोधन सोनटक्के व त्यांची पत्नी वैशाली हे दोघेही शिक्षक आहे. बदलीपूर्वी वैशाली ह्या कळमेश्वर जि.प. शाळेत तर शुद्धोधन हे सावनेर येथील खिल्लोरी शाळेत कार्यरत होते. तेव्हा दोघांमधील अंतर हे १२ कि.मी. होते. आता यांची आॅनलाईन बदली आहे. शुद्धोधन यांना रामटेक तालुक्यातील खुर्सापार अवघड क्षेत्रात तर वैशाली यांची नरखेड तालुक्यातील गुमगाव येथे बदली केली आहे. या दोन्हीतील अंतर २१२ कि.मी. आहे. शाळा जर सकाळच्या वेळेत असेल तर पहाटे ५ वाजतापासून त्यांना निघावे लागले. गुमगाव मध्ये जाण्यायेण्याचे साधन नाही. जंगल परिसर आहे. पावसाळ्यात तर गुमगावला जावू शकत नाही अशी अवस्था असते. घरी मुलगा ७ वर्षाचा आहे आणि तोही आजारी असतो. वृद्ध वडील आहे. त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हे पतीपत्नी या बदल्यांमुळे चांगलेच हतबल झाले आहे. अशीच काहीशी अवस्था चंद्रकांत मेश्राम व कविता मेश्राम, कश्यप सावरकर व शुभांगी सावरकर, संजय धाडसे व विजया धाडसे या शिक्षक दाम्पत्यांची बदलीनंतर झाली आहे. विस्थापित झालेल्या दाम्पत्यांचे असे शेकडो उदाहरण आहे. त्याचबरोबर एकल शिक्षकाच्या बदलीतही अन्याय झाल्याचे दिसते आहे. कुहीचा शिक्षक नरखेडला पाठविणे म्हणजे सर्कस करण्यासारखेच आहे.
झालेल्या बदल्यातून शिथिलता मिळावी म्हणून शिक्षकांनी शिक्षणाधिकारी, सीईओं यांच्याकडे निवेदन सादर केले. परंतु कुणीही जबाबदारी स्विकारायला तयार नाही. ही परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्याची नाही, राज्यभरात बदल्यांवरून संताप व्यक्त होत आहे. यवतमाळमध्ये शिक्षकांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये सुद्धा संताप वाढतो आहे. बदल्यांमुळे शिक्षकांची शिकविण्याची मानसिकता राहिली नाही, असा सूर शिक्षकांमध्ये उमटतो आहे.
मुलांना शिकवायचे कसे?
ग्रामीण भागात वाहतुकीच्या सोयी अपुऱ्या आहे. पावसाळ्यात तर शाळेत जाणे कठीण होते. बहुतांश शिक्षक हे नागपूर शहरात वास्तव्यास आहे. त्यामुळे जाण्यायेण्यात त्यांचा वेळ खर्ची जाणार आहे. मुलांना शिकवायचे कसे असा सवाल शिक्षकांनी केला आहे.