४०० स्थानकांवर ‘कुल्हड’मधून चहा; रेल्वेला पाठविला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:18 IST2019-09-09T01:50:00+5:302019-09-09T06:18:56+5:30
देशातील तब्बल ४०० रेल्वेस्थानकांवर लवकरच मातीच्या कुल्हडमधून चहा-कॉफी मिळणार आहे.

४०० स्थानकांवर ‘कुल्हड’मधून चहा; रेल्वेला पाठविला प्रस्ताव
नागपूर : देशातील तब्बल ४०० रेल्वेस्थानकांवर लवकरच मातीच्या कुल्हडमधून चहा-कॉफी मिळणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्यास अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
देशातील तब्बल ४०० रेल्वेस्थानकांवर लवकरच मातीच्या कुल्हडमधून चहा-कॉफी मिळणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्यास अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
कुल्हड मातीपासून बनविले जात असल्याने चहा-कॉफीची नैसर्गिक चव कायम राहते. शिवाय वापरलेल्या कुल्हडच्या मातीतून परत नवीन कुल्हड तयार होऊ शकतात. यामुळे पर्यावरणाचेदेखील संवर्धन होते. लवकरच ४०० रेल्वे स्थानकांवर कुल्हड अनिवार्य होतील, असे गडकरी यांनी सांगितले. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर राहणार आहे. मंत्रालयातर्फे ‘भारतक्राफ्ट’ नावाचे ई- कॉमर्स संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. दोन वर्षांत या संकेतस्थळाच्या माध्यमातून १० लाख कोटींची उलाढाल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
‘नॅपीअर’ गवतापासून ‘बायो सीएनजी’
‘नॅपीअर’ गवतापासून ‘बायो सीएनजी’ची निर्मिती करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे या गवताचे उत्पादन केले जाईल. नागपूर महानगरपालिकेच्या ५० बसेस बायो सीएनजीवर चालविल्या जातात. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात जट्रोफा या जैवइंधनाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या बिया वाटपाचाही कार्यक्रम सुरूकरण्यात आला आहे.