मनपाच्या कर्मचाऱ्यांवर चालविली तलवार-गुप्ती, आरोपींना अटक
By योगेश पांडे | Updated: June 18, 2023 18:59 IST2023-06-18T18:58:46+5:302023-06-18T18:59:06+5:30
पावसाळ्याच्या अगोदरची कामे करणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर गुप्तीने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

मनपाच्या कर्मचाऱ्यांवर चालविली तलवार-गुप्ती, आरोपींना अटक
नागपूर: पावसाळ्याच्या अगोदरची कामे करणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर गुप्तीने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात एक मनपा कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंतनगर येथे ही घटना घडली.
मनपाचे कर्मचारी आनंद सातपुते (४५) हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पावसाळी पाण्याचे चेंबर शोधण्यासाठी जेसीबी मशीनच्या माध्यमातून यशवंत नगर येथील वळणावर खोदकाम करत होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अंबाझरी टेकडी, भीम चौक येथील पियुष गजानन काळबांडे (१९), शैलेश पृथ्वीराज ब्राह्मणे (२५) व समीर रुपचंद दुपारे (२९) हे डागा ले आऊट परिसरातून आले व त्यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांनी काही कर्मचाऱ्यांना थेट मारायलाच सुरुवात केली. यामुळे काम थांबले. आरोपी तेथून गेले व काही वेळाने परतले. यावेळी त्यांच्या हातात शस्त्रे होती. समीरने सातपुते यांच्यावर तलवार उगारली. प्रसंगावधान राखत सातपुते यांनी ती हाताने पकडली. त्यामुळे त्यांच्या बोटाला जखमी झाली. तर आरोपी शैलेश याने गुप्तीने वार केल्याने विक्रम चव्हाण हे कर्मचारी जखमी झाले.
यानंतर आरोपी तेथून फरार झाले. मनपाच्या कर्मचाऱ्यांना चव्हाण यांना उपचारासाठी नेले. सातपुते यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.