तोट्यातील वेकोलिला विशेष मोहिमेद्वारे बाहेर काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:49 IST2018-07-21T18:48:48+5:302018-07-21T18:49:58+5:30
पाच वर्षांपासून कोट्यवधींच्या तोट्यातील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडला बाहेर काढण्यासाठी ‘मिशन : डब्ल्यूसीएल २.०’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात वेकोलिच्या सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी केले आहे. त्यामुळे कोळशाचे उत्पादन व विक्री वाढून तोटा भरून निघेल, असा विश्वास वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी व्यक्त केला.

तोट्यातील वेकोलिला विशेष मोहिमेद्वारे बाहेर काढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच वर्षांपासून कोट्यवधींच्या तोट्यातील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडला बाहेर काढण्यासाठी ‘मिशन : डब्ल्यूसीएल २.०’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात वेकोलिच्या सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी केले आहे. त्यामुळे कोळशाचे उत्पादन व विक्री वाढून तोटा भरून निघेल, असा विश्वास वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी व्यक्त केला.
पत्रकार क्लब आॅफ नागपूरतर्फे सिव्हिल लाईन्स येथील सभागृहात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर वेकोलिचे संचालक (कार्मिक) संजयकुमार, पत्रकार क्लब आॅफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, संचालक जोसेफ राव व सरिता कौशिक उपस्थित होते.
तोट्यानंतरही कंपनीचे नेटवर्थ पॉझिटिव्ह
मिश्र म्हणाले, २०१४-१५ मध्ये कंपनीला ५४४.७९ कोटींचा तोटा, २०१५-१६ मध्ये ३९४.२० कोटी, २०१६-१७ मध्ये १०७५.५१ कोटी आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षांत कंपनीला २८२९ कोटी २६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. तीन वर्षांत तोटा भरून काढण्याचे लक्ष्य आहे. तोटा असला तरीही कंपनीचे नेटवर्थ पॉझिटिव्ह आहे. कंपनीची मोहीम म्हणजे सिस्टिममध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत दिसून आला. पण दुसºया तिमाहीत पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला. सध्या कोळशाची मागणी वाढली आहे. वेकोलिच्या बहुतांश खाणी जमिनीखाली असल्यामुळे उत्पादनात अडचण येते. त्यानंतरही वर्ष २०१६-१७ च्या ४६.२२ दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत वर्ष २०१८-१९ मध्ये ५२.५० दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले. त्यात १३.६ टक्के वाढ झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये २३.४४ टक्के वाढीसह आतापर्यंत सर्वाधिक ४८.७६ दशलक्ष टन कोळशाचे वितरण केले. वेकोलिच्या इतिहासात पहिल्यांदा दोन आकडी वाढ नोंदविल्याची माहिती मिश्र यांनी दिली.
नव्याने ११ खाणी सुरू करणार
कोळशाचा खोलवर साठा, निम्न श्रेणीचा कोळसा, उत्पादन गुंतवणुकीत वाढ झाल्याने तोटा झाला आहे. दोन वर्षांत कंपनीला सर्वाधिक तोटा झाला. वेकोलिकडे मोठ्या खाणी नसल्यामुळे तात्काळ तोटा भरून काढणे शक्य नाही. त्यामुळेच उत्पादन आणि वित्तीय स्थिरतेसाठी क्षमता उच्चतर स्तरावर नेण्याचा प्रयत्न आहे. वेकोलिने १९ खाणी सुरू केल्या असून, ११ नव्याने सुरू करण्यात येणार आहे. अन्य राज्यातही खाणी सुरू करण्यात येणार असल्याचे मिश्र यांनी स्पष्ट केले.
रेती आणि पिण्याच्या पाण्याची विक्री
वेकोलिने कोळशा खाणीतून रेती काढणे सुरू केले आहे. हा प्रकल्प व्यावसायिकरीत्या दाखल करणार आहे. करारानुसार नासुप्र आणि पंतप्रधान आवास योजनेसाठी रेती उपलब्ध करून दिली आहे. ८ हजार क्युबिक मीटरचे लक्ष्य आहे. ७७५ रुपये क्यु. मीटर दराने निविदा काढणार आहे. रेतीला राज्याच्या सर्व भागातून मागणी आहे. याशिवाय खाणीतील पाण्याचा उपयोग सिंचन, वीजनिर्मिती प्रकल्प आणि पिण्यासाठी होत आहे. ४२ कोटी लिटर पाणी दररोज काढण्यात येत आहे. कॉलनी आणि खाणीच्या लगतच्या गावातील लोकांना पाणी नि:शुल्क देण्यात येत आहे. १० लाख बाटलीबंद बॉटल पाणी विकण्याचा व्यावसायिक उपक्रम सुरू होणार आहे. आता बॉटलचा दर केवळ ८ रुपये आहे. वेकोलिच्या ४९ कॉलनी अपग्रेड करण्यात येत आहेत. याशिवाय १ एप्रिल २०१९ पासून तीन मध्यवर्ती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे मिश्र म्हणाले.