टी-१ वाघीण; खासगी शूटरची ‘नवाबी’ भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:36 AM2018-10-25T11:36:11+5:302018-10-25T11:44:53+5:30

यवतमाळ भागात १३ जणांचे बळी घेणाऱ्या टी-१ वाघिणीला पकडण्याची किंवा ठार करण्याची वन विभागाची मोहीम दिवसेंदिवस अधिकच वादग्रस्त ठरत आहे.

T-1Tigress; attitude of Private shooter is problematic | टी-१ वाघीण; खासगी शूटरची ‘नवाबी’ भोवली

टी-१ वाघीण; खासगी शूटरची ‘नवाबी’ भोवली

Next
ठळक मुद्देवन विभागातील पत्रात खुलासा नवाबमुळेच हुकली संधी

संजय रानडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ भागात १३ जणांचे बळी घेणाऱ्या टी-१ वाघिणीला पकडण्याची किंवा ठार करण्याची वन विभागाची मोहीम दिवसेंदिवस अधिकच वादग्रस्त ठरत आहे. वाघिणीला ठार करण्यासाठी बोलाविलेला खासगी शूटर नवाबचा ‘नवाबी’ थाट वन विभागाला चांगलाच भोवत आहे. नवाबच्याच नवाबीमुळे या हिंस्र वाघिणीचा बंदोबस्त लावण्याची संधी दोनदा वन विभागाने गमावल्याचा धक्कादायक खुलासा उजेडात आला आहे. लोकमतला प्राप्त झालेल्या वन विभागाच्या एका आंतरिक पत्रामध्ये नवाबच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांअगोदर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांनी वाघिणीला पकडण्याच्या प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत नाराजी व्यक्त करीत एका महिला अधिकाºयाला शूटर नवाब शफात अली खान याला भेटून प्रकरणाबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. यानुसार पांढरकवडा वन विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाद्वारे २० सप्टेंबर २०१८ ला सादर करण्यात आलेल्या पत्रात खासगी शूटर नवाब हा वाघिणीचा बंदोबस्त करण्यास असक्षम असून, त्याच्या हलगर्जीपणामुळे एकदा नव्हे तर अनेकदा हिंस्र वाघिणीला पकडण्याची संधी हुकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यवतमाळ वन परिक्षेत्र विभागाला लिहिलेल्या या पत्रात नवाब हा स्थानिक ग्रामस्थांना वन विभागाच्याच विरोधात खोट्या अफवा पसरवीत असल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. या पत्राची गंभीर दखल घेत यवतमाळ परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक यांनी मुख्य वन्यजीव वॉर्डन यांना नवाबच्या बेजबाबदार वर्तणुकीबाबत माहिती दिली.
यवतमाळच्या पांढरकवडा व राळेगाव परिक्षेत्रात टी-१ वाघिणीने गेल्या काही महिन्यापासून धुमाकूळ घातला असून १३ लोकांचे बळी घेतले आहेत.
नागरिकांमध्ये भीती आणि रोष बघता पीसीसीएफ (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांनी यावर्षी ४ सप्टेंबरला वाघिणीला पकडण्याचे किंवा ठार करण्याचे आदेश जारी केले. वाघिणीच्या दोन पिल्लांना पकडून बचाव केंद्रात पाठविण्याचे या आदेशात सांगण्यात आले. या कामासाठी १० सप्टेंबर रोजी खासगी शूटर नवाब खानला नियुक्त करण्यात आले. पत्रामध्ये नमूद असलेल्या माहितीनुसार या मोहिमेदरम्यान वाघिणीला ठार करण्याच्या दोन सुवर्ण संधी वन विभागाला मिळाल्या होत्या. मात्र विभागाने या संधी गमावल्याचे त्यात नमूद करण्यात आले. वन विभागाचे आदेश १२ सप्टेंबरपासून वाघीण आणि पिल्लांची शोधमोहीम सुरू झाल्यानंतर १४ सप्टेंबरला पहिली संधी खैरगाव या गावाजवळ आली होती. मात्र शोधमोहिमेतील पथकाने तब्बल १४ तासपर्यंत ही माहिती कुणालाच दिली नाही.
त्यानंतर नवाब सहभागी असलेल्या शोध पथकाच्या एसीएफने १५ सप्टेंबरला ही माहिती पांढरकवडा डीसीएफला दिली. विशेष म्हणजे पांढरकवडा शोध पथकाच्या टीमला १४ रोजी खैरगावजवळ कम्पार्टमेंट ८६ च्या आसपास वाघिणीच्या पायाचे ठसे आढळून आले होते. ऐनवेळी ही माहिती डीसीएफ, डीएम असलेल्या टीमला मिळाली असती तर सामूहिक शोधमोहिमेद्वारे त्या वाघिणीला पकडणे शक्य झाले असते.

मोहीम वादाच्या भोवऱ्यात
डीसीएफच्या पत्रात १८ सप्टेंबर रोजी आलेल्या दुसऱ्या संधीचाही उल्लेख करण्यात आला आहे. ही संधी कम्पार्टमेंट १४९ मध्ये आली होती. या परिसरात वाघिणीने एका प्राण्याला मारल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीएफओ(वन्यजीव)च्या नेतृत्वात पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये पांढरकवडा डीसीएफद्वारे कम्पार्टमेंट १५० मधून समन्वय करण्यात येत होता. शिकार केलेल्या प्राण्याचे शव येथे पडले असल्याने वाघिण परत येईल ही आशा होती. सायंकाळी ५ वाजतापर्यंत वाघिण आसपास आढळून न आल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री ही शोधमोहिम थांबविण्यात आली व सकाळपर्यंत वाट पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी डीसीएफ यांनी नवाबच्या टीमला शिकार असलेल्या परिसरात न जाता दूर राहून कुठलाही आवाज न करता शांतपणे वाट पाहण्याची सूचना केली होती. मात्र नवाब टीमने ठरलेल्या योजनेकडे आणि सूचनेकडे दुर्लक्ष करीत आपले वाहन मांस असलेल्या ठिकाणाच्या जवळ नेले आणि कुठल्याही योजनेशिवाय तेथे थांबविले. या आवाजाच्या व्यत्ययामुळे टी-१ वाघिण शिकार असलेल्या ठिकाणी येण्याची शक्यताच मावळली व ही संधीसुद्धा वन विभागाच्या हातून सुटल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय नवाब या भागातील गावकऱ्यांना वन विभागाविरोधात अपप्रचार करीत असल्याचा आरोपही या पत्रात लावण्यात आला आहे. या सर्व आरोपांमुळे ही मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Web Title: T-1Tigress; attitude of Private shooter is problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ