हात-पाय लुळे पडण्याची लक्षणे? ; असू शकतो जीबीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2023 08:00 IST2023-05-06T08:00:00+5:302023-05-06T08:00:07+5:30
Nagpur News कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये ‘जीबीएस’ (गुलियन बॅरी सिंड्रोम) आजार समोर येत आहे. हा आजार दुर्मीळ असून, त्याची लक्षणे दिसताच तातडीने उपचार केल्यास धोका टाळता येतो.

हात-पाय लुळे पडण्याची लक्षणे? ; असू शकतो जीबीएस
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये ‘जीबीएस’ (गुलियन बॅरी सिंड्रोम) आजार समोर येत आहे. हा आजार दुर्मीळ असून, त्याची लक्षणे दिसताच तातडीने उपचार केल्यास धोका टाळता येतो. नागपूरच्या मेडिकलमध्ये नुकतेच एका १९ वर्षीय युवतीवर, तर एका खासगी रुग्णालयात १४ वर्षांच्या मुलावर उपचार करून त्यांना नवे जीवन देण्यात आले.
-काय आहे जीबीएस?
‘जीबीएस’ हा दुर्मीळ ‘न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर’ आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास पटकन लागण होते. मज्जातंतू हळूहळू निकामी करून आजाराचा विषाणू बोट, पाय, हात, फुप्फुस, श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.
-लक्षणे काय?
हात आणि पायातील स्नायू कमकुवत होतात. रुग्णाला बसण्या व उठण्यात त्रास होतो. श्वास घेण्यास त्रास होतो. काही रुग्णांमध्ये चालताना किंवा उभे राहताना तोल जातो. डोळ्याचे स्नायू कमकुवत होऊन दृष्टी कमी होते. दोन-दोन दिसायला लागतात. काही रुग्णांमध्ये गिळायला त्रास होतो. काहींमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्नायू कमकुवतही होऊ शकतात. काहींना अर्धांगवायूचा त्रास सुरू होतो.
-वेळेत उपचार घेतल्यास धोका टळतो
‘जीबीएस’मध्ये ‘नर्व्हस्’चे वरचे ‘कोटिंग’ खराब होतात. तातडीने योग्य उपचार न घेतल्यास ‘नर्व्हस्’ डॅमेज होण्याची शक्यता असते. यामुळे वेळेत उपचार घेऊन जिवाचा धोका टाळता येतो.
-हे आहेत उपचार
श्वसनाचा त्रास व लकवा मारलेल्या रुग्णांना ‘इमिओग्लोब्युलेंट’चे इंजेक्शन द्यावे लागतात. रुग्णाच्या श्वासनलिकेवर व्हायरसचा हल्ला झाल्यास श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात येते. रुग्णाच्या पुनर्वसनासाठी फिजिओथेरपीही महत्त्वाची ठरते.
- कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये लक्षणे
एखादा नवीन विषाणू किंवा जिवाणू शरीरात प्रवेश केल्यास किंवा नवी प्रतिबंधक लस घेतल्यास तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती गोंधळून जाते आणि मज्जातंतूवर हल्ला करू लागते. कोविड हा नवीन विषाणू असल्याने नैसर्गिकरीत्या जीबीएसची प्रकरणे वाढल्याचे दिसून आले.
- ‘जीबीएस’ हा दुर्मीळ व न्यूरोलॉजिकल गुंतागुंत
एखाद्या रुग्णाला व्हायरल झाल्यानंतर सात-आठ दिवसांत हातापायाचे स्नायू कमकुवत झाल्यासारखे वाटत असतील, गिळायला त्रास होत असेल किंवा तोल जात असेल तर त्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ‘जीबीएस’ हा एक दुर्मीळ व न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीचा आजार आहे.
-डॉ. अमित भट्टी, न्यूरोलॉजी इंटरव्हेंशनलतज्ज्ञ