विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानीचा दावा
By Admin | Updated: July 20, 2014 23:30 IST2014-07-20T23:30:49+5:302014-07-20T23:30:49+5:30
विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे.

विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानीचा दावा
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे. या जागांसाठी महायुतीकडे दावा केला जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर खा. राजू शेट्टी हे चिखली येथील एल्गार मेळाव्यानिमित्त प्रथमच विदर्भाच्या दौर्यावर आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. विदर्भातील चिखली, खामगाव, बाळापूर, कारंजा लाड, वणी, वरूड, रामटेक, देवळी आणि काटोल हे ९ विधानसभा मतदारसंघ लढण्यास सक्षम उमेदवार संघटनेकडे असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील ९ जागांसह राज्यातील ६५ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे यासंदर्भातही संघटना महायुतीशी चर्चा करणार आहे. महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येईल. लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही जागा वाटपाचा तिढा सोडविला जाईल, असे ते म्हणाले.
विदर्भातील शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर खा.शेट्टी यांनी चिंता व्यक्त केली. शेतकर्यांचे विज बिल माफ करावे, त्यांचा सातबारा कोरा करावा, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना ५0 हजार रूपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यासाठी संघटना लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कांदे, बटाटे यांचा जिवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केल्यामुळे, या उत्पादनाला हमी भाव देण्याची जबाबदारीही केंद्र सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांचे ७२ हजार कोटी रूपये माफ केल्याचा दावा केंद्रातील युपीए सरकारकडून केला जातो. प्रत्यक्षात हा आकडा ५२ हजार कोटी रूपये असून, उद्योगपतींना मात्र २७ हजार कोटी रूपये शासनाने माफ केले असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंचन घोटाळा, शेतकर्यांच्या मालास हमी भाव या मुद्यांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बुलडाणा जिल्हा बँकेच्या संचालकांवरिूध्द कारवाई करण्याची मागणी खा. शेट्टी यांनी यावेळी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोणत्याही गावगुंडांना भित नाहीत. काँग्रेसने त्यांच्या आमदाराला आवरावे, अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. यावेळी संघटनेचे स्थानिक तसेच प्रदेश स्तरावरील नेतेही उपस्थित होते.