श्रीनिधीच्या स्वरांच्या हार्मनीने जिंकले
By Admin | Updated: December 24, 2014 00:41 IST2014-12-24T00:41:04+5:302014-12-24T00:41:04+5:30
जुन्या-नव्या गीतांचे सादरीकरण करीत आज ‘हार्मनी विथ श्रीनिधी’ या गीतांच्या कार्यक्रमात श्रीनिधी घटाटे या गुणी गायिकेने रसिकांना जिंकले.

श्रीनिधीच्या स्वरांच्या हार्मनीने जिंकले
जुन्या-नव्या गीतांचे सादरीकरण : हार्मनी विथ श्रीनिधी
नागपूर : जुन्या-नव्या गीतांचे सादरीकरण करीत आज ‘हार्मनी विथ श्रीनिधी’ या गीतांच्या कार्यक्रमात श्रीनिधी घटाटे या गुणी गायिकेने रसिकांना जिंकले.
एरवी गीतांचे अनेक कार्यक्रम होतात. त्यात प्रामुख्याने जुनी चित्रपटगीतेच सादर केली जातात. या गीतांचा खास असा प्रेक्षकवर्गही आहे. पण नवे संगीतकारही सध्या चांगले संगीत देत आहेत.
अनेक अवीट गीतांची निर्मिती हे संगीतकार करीत आहेत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गीते, ठुमरीसदृश गीते रसिकप्रियही होत आहेत. पण बहुधा नवी गीते कार्यक्रमात सादर करण्यात येत नाहीत. श्रीनिधीने मात्र आजच्या कार्यक्रमात अनेक नव्या गीतांच्या सादरीकरणानेही रंगत आणली.
सिद्धिविनायक पब्लिसिटीद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात मयंक लखोटिया आणि श्रीनिधी घटाटे यांनी तयारीने सादरीकरण करून रसिकांची दाद घेतली. श्रीनिधी ही गोड गळ्याची गायिका आहे.
तिच्या गायनावर रसिकांचे प्रेमही आहे. त्यामुळेच श्रीनिधीचा स्वतंत्र कार्यक्रम ऐकण्यासाठी रसिकांनीही सभागृहात गर्दी केली होती. प्रामुख्याने महाविद्यालयीन रसिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यात श्रीनिधीने ‘मै तेणु समझावाणी...’ या सध्या लोकप्रिय असलेल्या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि त्यानंतर तिने अनेक गीतांनी रसिकांची दाद घेतली.
वन्समोअर, टाळ्या घेत तिचा हा कार्यक्रम रंगला. याप्रसंगी श्रीनिधीने ‘लग जा गले..., क्या जानु सजन..., वो जो अधुरीसी बात बाकी है..., सावन बिता जाए पियरवा..., मोरा सैंया मोसे बोले ना..., सुन रहा है न तु..., तु तू है वही...इश्क सुफियाना...’ अशा विविधांगी गीतांनी रंगत आणली.
सुफी शैली, ठुमरी शैलीतील गीतेही तिने नजाकतीने सादर करून तिच्या गानक्षमतेचा परिचय दिला. भविष्यात एक चांगली गायिका होण्याची नांदीच या तिच्या सादरीकरणात होती.
तरल भावस्पर्शी आवाज आणि स्वरांची जाण तिच्या गायनाचे सामर्थ्य म्हणावे लागेल. याप्रसंगी मयंक लखोटियानेही रसिकांना जिंकले. ‘मर जाऊ या जी लू जरा...’ सारख्या अनेक गीतांनी त्याने वन्समोअर घेतला. कार्यक्रमाचे निवेदन रूपाली कोंडेवार-मोरे यांनी केले. (प्रतिनिधी)