विदेशींना भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट न देण्याचे आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनलचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:28 IST2018-01-18T21:22:07+5:302018-01-18T21:28:19+5:30
विदेशी पर्यटकांनी भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊ नये, असे धक्कादायक आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संघटनेचा व संघटनेचे संचालक स्टीफन कॉरी यांचा पेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी गुरुवारी निषेध केला.

विदेशींना भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट न देण्याचे आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनलचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशी पर्यटकांनी भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊ नये, असे धक्कादायक आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संघटनेचा व संघटनेचे संचालक स्टीफन कॉरी यांचा पेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी गुरुवारी निषेध केला.
संघटनेने विदेशी पर्यटकांना उद्देशून एक ई-मेल लिहिला आहे. भारत सरकार आदिवासींना वनांमधून हाकलून लावत आहेत. आदिवासींचे मूळ निवासस्थान वने आहेत. ते वनांची काळजी घेतात. परंतु, आता अनेक वने व्याघ्र अभयारण्य घोषित करण्यात आल्यामुळे आदिवासींना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. तसेच, वाघ पाहण्यासाठी वनांमध्ये पर्यटकांच्या हजारो वाहनांना सोडले जाते. त्यामुळे वाघांचे जनजीवन प्रभावित होते व वनातील प्रदूषणाची पातळी वाढते. परिणामी विदेशी पर्यटकांनी भारतीय व्याघ्र अभयारण्यात जाऊ नये असे संघटनेने म्हटले आहे. आदिवासी विकासाकरिता कार्य करणाऱ्या सातपुडा फाऊंडेशन संस्थेने हा ई-मेल उघडकीस आणला.
इको डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष बंडू उईके यांनी संघटनेला अशा प्रकारचे आवाहन करण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न निषेध बैठकीत बोलताना उपस्थित केला. सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी हे भारताविरुद्धचे अभियान असल्याचा आरोप केला. एनएनटीआरचे मुकुंद धुर्वे, सातपुडा फाऊंडेशनचे सहायक संचालक अभिजित दत्ता आदींनीही सर्व्हायव्हल इंटरनॅशनलवर निशाणा साधला.