१६० सागवान तस्करांचे आत्मसमर्पण
By Admin | Updated: December 23, 2014 00:35 IST2014-12-23T00:35:29+5:302014-12-23T00:35:29+5:30
सिरोंचा व आसरअल्ली वनपरिक्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने १६० सराईत सागवान तस्करांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्बरिशराव आत्राम यांच्या समक्ष सशस्त्र आत्मसमर्पण केले.

१६० सागवान तस्करांचे आत्मसमर्पण
सराईत सागवान तस्करांचा समावेश : आत्राम यांचे समक्ष सशस्त्र शरणागती
सिरोंचा : सिरोंचा व आसरअल्ली वनपरिक्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने १६० सराईत सागवान तस्करांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्बरिशराव आत्राम यांच्या समक्ष सशस्त्र आत्मसमर्पण केले.
आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील होते. मंचावर सिरोंचाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, तालुका दंडाधिकारी केशव मिश्रा, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग मरस्कोल्हे, जि. प.महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, पंचायत समिती सभापती लालूबाई मडावी, आसरअल्लीचे सरपंच लक्ष्मण सिडाम, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कलाक्षपवार, जि. प. सदस्य व्यंकटेश्वर शानगोंडा, निर्मला इप्पापुला, पं. स. सदस्या कलावती झोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरगेलवार, राष्ट्रीय परिषदचे अध्यक्ष सत्यनारायण मंचालवार, संदीप राचर्लावार, नाविसचे तालुकाध्यक्ष बापू रंगुवार आदी उपस्थित होते.प्रथम निसर्गदेवतेचे पूजन करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.
आसरअल्ली येथील भाष्कर गुडीमेटला यांच्या वाद्यवृंद संचाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे गीत तेलगू भाषेत सादर केले. उपविभागीय वनाधिकारी एल. एम. बेलेकर यांनी लाकूड तस्करीपासून ग्रामीणांना परावृत्त करून सामाजिक प्रवाहात आणण्याबाबतची वनविभागाची भूमिका व भविष्यातील विविध उपक्रमांबद्दलची माहिती प्रास्ताविकातून विषद केली. याप्रसंगी कलाक्षेपवार यांच्यासह आत्मसमर्पित तस्करांनीही मनोगत व्यक्त करताना सागवन तस्करीस तिलांजली देत असल्याचे सांगून स्टॅम्प पेपरवर सत्यापन केले.
ना. आत्राम यांनी आत्मसमर्पित तस्करांचे अभिनंदन करून त्यांच्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.संचालन वनरक्षक सुजाता अडगोपुलवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)