सुरेश भटांची गझल म्हणजे शब्दोत्सवच

By Admin | Updated: March 15, 2015 02:20 IST2015-03-15T02:20:43+5:302015-03-15T02:20:43+5:30

कवी सुरेश भट म्हणजे शब्द आणि आशयाला अधिक गहन अर्थ देणारे गझलकार. त्यामुळेच त्यांचे चाहते जेथे मराठी आहे तेथे जगभरात आहे.

Suresh Bhat's ghazal is the word festival | सुरेश भटांची गझल म्हणजे शब्दोत्सवच

सुरेश भटांची गझल म्हणजे शब्दोत्सवच

नागपूर : कवी सुरेश भट म्हणजे शब्द आणि आशयाला अधिक गहन अर्थ देणारे गझलकार. त्यामुळेच त्यांचे चाहते जेथे मराठी आहे तेथे जगभरात आहे. त्यांची गझल म्हणजे शब्दांचा उत्सवच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी व्यक्त केले.
गिरीश गांधी प्रतिष्ठान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्यावतीने मराठी गझल आणि गझलसम्राट सुरेश भट विषयावरील चर्चासत्राचे आयोजन श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. उद्घाटन विभागीय आयुक्त अनुपकुमार , प्रसिद्ध गझलकार व सुरेश भट यांचे शिष्य प्रदीप निफाडकर, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. प्रमोद मुनघाटे, गिरीश गांधी प्रतिष्ठानचे सचिव अजय पाटील, डॉ. अनिल नितनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, १९६३ पासून मराठी गझलवर सुरेश भटांची सत्ता आहे. भटांच्या काव्य निर्मितीचा धावता आढावा त्यांनी घेतला. सुरेश भटांच्या गझलांनी पु. ल. देशपांडे वेडे झाले होते तर भटांची गझल म्हणजे सुरेल गाणेच, असे लतादीदी म्हणाल्या होत्या. एखादी भावना प्रभावीपणाने सहजपणे साध्या शब्दात कुणी व्यक्त करावी तर ती भटांनीच. त्यांनी भटांच्या गझलांवर उदाहरणांसह भाष्य केले.
विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनीही त्यांच्या रसिकतेचा परिचय देत मनोगत व्यक्त केले. १३ व्या शतकातील सुफी काव्याचे आद्यकवी आमिर खुस्रोपासून विविध भाषांत उत्क्रांत झालेल्या गझलपासून कवी सुरेश भटांच्या गझल निर्मितीपर्यंतचा प्रवास त्यांनी त्यांनी अभ्यासपूर्णतेने व्यक्त केला. भटांच्या मानवी मनाला स्पर्श करणाऱ्या गझल पिढ्यानपिढ्या सामान्यांच्याही ओठांवर सहजपणे राहातात.
हेच त्यांचे मोठेपण आणि वेगळेपण आहे, असे ते म्हणाले, अक्षयकुमार काळे यांनी गझलला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणाऱ्या सुरेश भटांच्या पूर्वीचे कवी माधव ज्युलियन यांच्या भावगीत सदृश गझलांसह, शायर मीर, जिगर मुरादाबादी यांच्या उर्दू गझल रचनांवरही प्रकाश टाकला. भटांच्या गझल रचनेतील प्रयोगशीलता, त्यांनी गझलला प्रदान केलेले सौंदर्य, अनुभूतीची तीव्रता, ह्रदयातील वेदनेला असरदार शब्दांसह लाभलेले गझलरूप, प्रेमकवितेतील तरल शृंगारभाव यासह कायम आपल्या दु:खाला कुरवाळणाऱ्या या गझल सम्राटाच्या भावपूर्ण शब्दातून प्रकटलेली वेदना ‘दु:ख माझे माझियापाशी असू दे, ते बिचारे एकटे जाईल कोठे’ या ओळी त्यांनी सादर केल्या.
वामन तेलंग यांनी भटांच्या सहवासातील अनेक आठवणींचा पट उलगडला. भटांनी अमरावतीतून सुरू केलेले डंका आणि आझाद साप्ताहिकामधील पत्रकारिता व त्यांची काव्यनिर्मिती याबद्दल त्यांनी माहिती दिली. यानंतर भटांच्या मुलाखतीची चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. द्वितीय सत्रात कवी प्रदीप निफाडकर यांचे बीजभाषण झाले. त्यांनी सुरेश भट आणि माधव ज्युलियन यांची साम्यस्थळे सांगितली. या दोघांचेही मराठी भाषेवरचे प्रेम, फारशी भाषेचा अभ्यास आणि त्यांच्या गझलनिर्मितीचा आढावा घेत त्यांनी भटांच्या अनेक ओळी ऐकविल्या. गझल आणि फझल यातील फरक सांगून त्यांनी समीक्षकांनी गझलच्या सूक्ष्म अभ्यासानंतरच समीक्षा लेखन करावे, अशी सूचना केली. यानंतर त्यांनी स्वत:च्या गझलांचे सादरीकरण केले.
यानंतर डॉ. श्याम माधव धोंड, डॉ. तीर्थराज कापगते, डॉ. सुनील रामटेके यांनी निबंधवाचन केले. त्यानंतऱ्या सत्रात सुरेश भट आणि त्यांची गझल विषयावर डॉ. वि. स. जोग, राजेश देशपांडे, डॉ. पुरुषोत्तम माळोदे, डॉ. हेमंत खडके यांचे निबंधवाचन झाले. पाचव्या सत्रात कवी बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेत ह्रदय चक्रधर, ललित सोनोने, नीलकांत ढोले, दीपमाला कुबडे, ताराचंद चव्हाण, संजय इंगळे तिगावकर, सिद्धार्थ भगत, आबेद शेख यांनी काव्यवाचन करून भट यांना आदरांजली अर्पण केली. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.े संचालन कोमल ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Suresh Bhat's ghazal is the word festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.