नागपुरातील सनफ्लॉवर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड; कारण काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 18:03 IST2022-03-10T15:32:33+5:302022-03-10T18:03:00+5:30
हॉस्पिटलमधील बायो वेस्ट संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असूनही सनफ्लॉवर हॉस्पिटलमधील बायो वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले.

नागपुरातील सनफ्लॉवर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड; कारण काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी रामदासपेठ येथील व्हीआयपी रोडवरील सनफ्लॉवर हॉस्पिटलमधील बायो मेडिकल वेस्ट सामान्य कचऱ्यामध्ये टाकल्यामुळे या हॉस्पिटलला एक लाख रुपयाचा दंड ठोठावला.
हॉस्पिटलमधील बायो वेस्ट संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असूनही सनफ्लॉवर हॉस्पिटलमधील बायो वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले.
धरमपेठ झोनच्या पथकाद्वारे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशवीसंदर्भात कारवाई करण्यात आली. सिव्हिल लाईन्स सदर येथील व्हीसीए स्टेडियम हॅण्डलुम एक्सपोमध्ये प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल पाच हजार रुपयाचा दंड करण्यात आला. कॉटन मार्केट येथील अमेसर ॲण्ड कंपनी या दुकानावर कारवाई करून पाच हजार रुपये, गांधीबाग झोनअंतर्गत गोळीबार चौक इतवारी येथील नानक प्लास्टिक आणि राजेश प्लास्टिक या दुकानांवर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल केला.
प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर मनपाद्वारे दररोज कारवाई केली जाणार आहे. मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी ही कारवाई करणार आहेत.
दरम्यान, उपद्रव शोध पथकाने बुधवारी पाच प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लक्ष २० हजार रुपयाचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.