चैत्यन्यपीठातून मिळते सुमित्राताईंना ऊर्जा
By Admin | Updated: June 7, 2014 02:13 IST2014-06-07T02:13:40+5:302014-06-07T02:13:40+5:30
केंद्रात सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये

चैत्यन्यपीठातून मिळते सुमित्राताईंना ऊर्जा
नव्या लोकसभाध्यक्षांचे श्रद्धास्थान: शंकरनगरात गुरूंचे समाधीस्थळ
नागपूर: केंद्रात सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये नागपूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नागपूरचे संघ मुख्यालय श्रद्धास्थान आहे तर लोकसभा अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्या मराठी कन्या सुमित्रा महाजन ज्यांना गुरू मानत त्या नाना महाराज तराणेकर यांचे समाधीस्थळ नागपुरात आहे.
नानामहाराज तराणेकर हे इंदूरचे. सुमित्रा महाजन यांचे गुरू होते. त्यांचे समाधीस्थळ शंकरनगरात आहे. चैतन्यपीठ म्हणून ते ओळखले जाते. महाराजांच्या भक्तगणांसाठी हे स्थळ श्रद्धास्थान असून नागपुरात आल्यावर सुमित्राताई येथे आवर्जून भेट देतात. समाधीस्थळी मस्तक टेकवतात. गुरुकृपेमुळेच जीवनात यश मिळाल्याची भावना त्या व्यक्त करतात, असे या मठाचे कार्यकारी अध्यक्ष राजीव हिंगवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. चैतन्यपीठाचा लोकार्पण समारंभ नोव्हेंबर २0१२ मध्ये झाला तेव्हा सुमित्राताई आवर्जून उपस्थित होत्या. या कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत त्यांनी लेखही लिहिला होता, असे हिंगवे यांनी सांगितले. सुमित्राताईंना गुरुभगिनी मानणार्या हिंगवे यांना त्या लोकसभा अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. त्यांनी सकाळी अभिनंदनपर संदेशही त्यांना पाठविला. नागपुरात त्यांचा अभिनंदन सोहळो घेण्याचीही इच्छा त्यांनी बोलून दाखविली.
सुमित्राताईंचा जन्म कोकणातील (चिपळूण) असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द भरभराटीस आली ती इंदूर (म.प्र.)मध्ये. सुरुवातीपासूनच राष्ट्रसेविका समितीशी त्या जुळल्याने त्यांचे संघ मुख्यालयी म्हणजे नागपुरात विविध कार्यक्रमांसाठी येणे होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्या उपस्थित होत्या.
२00२ मध्ये रेशीमबागमध्ये झालेल्या नारी चेतना संमेलनातही त्या उपस्थित होत्या. त्यामुळे या शहरातही भाजप, संघ आणि सेविका समितीशी जुळलेले कार्यकर्ते सुमित्राताईंशी परिचित आहेत.
दिवंगत सुमतीताई सुकळीकर यांच्या भेटीसाठी त्या नेहमीच येत असत. बालजगतलाही त्यांनी अनेकदा भेटी दिल्या, असे जगदीश सुकळीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधिी)
नागपूर नागरिक बँकेवर विश्वास
इंदूरमधील हिंदू नागरी सहकारी बँक आर्थिक अडचणीत होती तेव्हा त्या बँकेला नागपूर नागरिक सहकारी बँकेने ताब्यात घ्यावे यासाठी सुमित्राताईंनी पुढाकार घेतला होता. ही बँक सक्षमपणे इंदूरची बँक चालवू शकेल असा विश्वास त्यांना होता, असे नागपूर नागरिक सहकारी बँकेचे संचालक व नगरसेवक गिरीश देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.