एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या
By Admin | Updated: October 6, 2014 00:51 IST2014-10-06T00:51:03+5:302014-10-06T00:51:03+5:30
मुलांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या एका दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वावलंबीनगर भागातील आशीर्वाद कॉलनीत घडली.

एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या
आशीर्वाद कॉलनीत हळहळ
नागपूर : मुलांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या एका दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वावलंबीनगर भागातील आशीर्वाद कॉलनीत घडली.
दीपक भीमराव मोहरील (६८) आणि वासंती दीपक मोहरील (६१), असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार दीपक मोहरील हे भंडाऱ्याच्या एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते पत्नीसह नागपुरात कायमच्या वास्तव्यास आले. त्यांना मुलगा आणि मुलगी असून मुलगा अमेरिकेत तर मुलगी पुणे येथे आहे. हे दाम्पत्य आजारी होते आणि एकाकी जीवन जगत होते.
मोहरील यांच्याकडे मोलकरीण कामाला होती. नेहमीप्रमाणे ती आजही सकाळी कामाला आली होती. दार आतून बंद असल्याने तिने बराच वेळ दार ठोठावून आवाज दिला होता. परंतु आतून कोणताही प्रतिसाद नव्हता. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना सांगितले. याबाबतची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दार तोडताच हे दाम्पत्य नजरेस पडले. दोघांच्याही तोंडातून फेस येत होता आणि कीटकनाश्क औषधांची रिकामी बाटली पडलेली होती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे रवाना केले.
वनिता युवराज शिरुरकर (३७) रा. एकात्मतानगर जयताळा यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)