सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या सहाव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 16:31 IST2022-12-29T16:29:14+5:302022-12-29T16:31:31+5:30
Nagpur News स्पॉंडिलायटीसच्या आजाराने त्रस्त असलेल्या इसमाने संत जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या सहाव्या माळ्यावर जाऊन विषारी औषध प्राशन करून उडी घेत आत्महत्या केली.

सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या सहाव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या
नागपूर : स्पॉंडिलायटीसच्या आजाराने त्रस्त असलेल्या इसमाने संत जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या सहाव्या माळ्यावर जाऊन विषारी औषध प्राशन करून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
संतोष शाहू (४२, हनुमान मंदिराजवळ, जुनी शुक्रवारी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. तो धान्याची दलाली करीत होता. संतोषला स्पॉंडिलायटीसचा आजार होता. गुरुवारी सकाळी ११:३० वाजता त्याने संत जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या बाहेर आपली ज्युपिटर क्रमांक (एमएच ४९ एझेड ३१८१) उभी केली. त्यानंतर दुचाकीच्या डिक्कीला चावी तसीच सोडून तो थेट सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या सहाव्या माळ्यावर गेला. तेथे त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याने सहाव्या माळ्यावरून खाली उडी घेतली. डोक्याच्या भारावर पडल्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. संतोषच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी, तीन वर्षांची मुलगी असून, त्याने ११ वर्षांची मुलगी दत्तक घेतली असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. संतोषच्या दुचाकीच्या डिक्कीत असलेल्या गाडीच्या कागदपत्रांवरून त्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना सूचना दिली. लगेच रुग्णालयात त्याची आई, पत्नी आणि नातेवाईक पोहोचले. संतोषची आई आणि पत्नीला त्याच्या आत्महत्येमुळे जबर धक्का बसला आहे.
मित्रांसोबत मारल्या गप्पा
संतोष नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेला. मॉर्निंग वॉकवरून परत आल्यानंतर त्याने अर्धा तास मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारल्या. तेथून तो ८:१५ वाजता घराकडे गेला. परंतु, त्याच्या बोलण्यावरून तो असे काही पाऊल उचलेल, अशी कल्पनाही आली नसल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.
.......