मुनगंटीवार, गावित, चव्हाण, खाडेंना धक्का; विखे पाटील, महाजन, पाटील, लोढा या ज्येष्ठांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:09 IST2024-12-16T08:07:43+5:302024-12-16T08:09:55+5:30
शिंदे सरकारमधील पाच जणांना भाजपने पुन्हा दिली मंत्रिपदाची संधी; मंत्रिपदाबाबत भाजपचे धक्कातंत्र; नवीन चेहऱ्यांचा केला समावेश

मुनगंटीवार, गावित, चव्हाण, खाडेंना धक्का; विखे पाटील, महाजन, पाटील, लोढा या ज्येष्ठांना संधी
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या चार ज्येष्ठ नेत्यांना भाजपने पुन्हा मंत्रिपद नाकारले. त्यात सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांचा समावेश आहे. चौघेही विधानसभेवर पुन्हा निवडून आले असले तरी मंत्रिपदापासून वंचित राहिले.
मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर पाच महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बल्लारपूर मतदारसंघात विजय मिळविला. यावेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते; पण राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली.
मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा या ज्येष्ठांबाबत भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. त्यातील मुनगंटीवार यांना संधी नाकारण्यात आली; पण अन्य चौघांना मंत्रिपद मिळाले.
पुन्हा मंत्री झाले, पण आता खाते कोणते?
प्रख्यात बिल्डर असलेले मंगलप्रभात लोढा हे सहाव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. २०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. पण शिंदे सरकारमध्ये त्यांना आधी महिला व बाल कल्याण, पर्यटन व काैशल्य विकास ही महत्त्वाची खाती मिळाली, मात्र नंतर अन्य दोन्ही खाती त्यांच्याकडून काढली गेली आणि त्यांच्याकडे फक्त कौशल्य विकास खाते होते. आता ते पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
मंत्रिपद गेले; मुलगी आणि बंधूही पराभूत झाले
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये दीर्घकाळ मंत्रिपदी राहिलेले डॉ. विजयकुमार गावित यांना शिंदे सरकारमध्ये भाजपने आदिवासी विकास हे खाते दिले होते. यंदा ते नंदुरबारमध्ये जिंकले. त्यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांनी अक्कलकुवामध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली होती. पाच महिन्यांपूर्वी नंदुरबार मतदारसंघात डॉ. हीना गावित भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढल्या; पण त्यांचा दारुण पराभव झाला होता. विजयकुमार गावित यांचे दोन बंधूही अन्य मतदारसंघांतून आणि अन्य पक्षांकडून लढले, मात्र पराभूत झाले. आता त्यांना पक्षाने मंत्रिपद नाकारले.
हे नेते पुन्हा झाले मंत्री
शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारमधील राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा आणि अतुल सावे पुन्हा मंत्री झाले.
काहींची संधी हुकली, तर कुणाला मिळाली
- सुरेश खाडे हे भाजपचे ज्येष्ठ आमदार. ते अनुसूचित जातीतून येतात. शिंदे सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. यावेळी त्यांची संधी हुकली.
- फडणवीस यांच्याशी असलेले घट्ट संबंध, संकटमोचक ही प्रतिमा गिरीश महाजन यांच्यासाठी धावून आली.
- चंद्रकांत पाटील हे फडणवीस यांचा पाठिंबा आणि संघ परिवाराचे बळ यामुळे पुन्हा एकदा मंत्री झाले.
- लोढा यांना मंत्रिपदाची कामगिरी, फडणवीस यांचा विश्वास आणि संघ परिवाराचा आशीर्वाद कामी आला, असे म्हटले जाते.