मार्चमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार
By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 20, 2024 20:40 IST2024-03-20T20:39:44+5:302024-03-20T20:40:38+5:30
ग्राहकांच्या सुविधेसाठी नोंदणी महानिरीक्षकांचे आदेश.

मार्चमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार
नागपूर : मार्चमध्ये २३ आणि २४ मार्च तसेच २९ ते ३१ मार्च, असे पाच दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. पण राज्य सरकारच्या पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने दुय्यम निबंधक कार्यालये उपरोक्त दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही कामकाज होणार आहे.
राज्य सरकारतर्फे दरवर्षी १ एप्रिलला वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते प्रसिद्ध होते. त्यामुळे मार्च महिन्यात राज्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होते. याच कारणांनी मार्च महिन्यात अखेरच्या दिवसात पाचही दिवस दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये कामकाज होणार आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षांचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज आणि दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुविधांसाठी राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी आणि सर्व दुय्यम निबंधक कार्यालये २३ व २४ मार्च आणि २९ ते ३१ मार्च या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी सुरू ठेवण्याचे आदेश पुणे मुख्य कार्यालयाचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनावणे यांनी १९ मार्च रोजी काढले आहेत.