पोलीस उपनिरीक्षक भरती मॅटच्या निर्णयाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:12 IST2020-12-30T04:12:17+5:302020-12-30T04:12:17+5:30
नागपूर : पोलीस उपनिरीक्षक भरतीमध्ये शारीरिक चाचणीची संधी मिळावी याकरिता एका पीडित उमेदवाराने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठात अर्ज ...

पोलीस उपनिरीक्षक भरती मॅटच्या निर्णयाधीन
नागपूर : पोलीस उपनिरीक्षक भरतीमध्ये शारीरिक चाचणीची संधी मिळावी याकरिता एका पीडित उमेदवाराने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे न्यायाधिकरणने संबंधित भरती सदर अर्जावरील अंतिम निर्णयाधीन राहील असा आदेश दिला आहे. तसेच, राज्य सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
नीलेश खोब्रागडे (बेझनबाग) असे उमेदवाराचे नाव असून ते सध्या पोलीस कॉन्स्टेबल आहेत. राज्य सरकारच्या वतीने ३२२ पोलीस उपनिरीक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये खोब्रागडे उत्तीर्ण झाले व ते शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले. परंतु, कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने निर्धारित कार्यक्रमानुसार शारीरिक चाचणी होऊ शकली नाही. या चाचणीकरिता ३ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. तसेच, शारीरिक चाचणीत सहभागी होण्यासाठी कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार खोब्रागडे यांनी ३० नोव्हेंबर रोजी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. करिता, त्यांनी शारीरिक चाचणीकरिता दुसरी तारीख मिळण्यासाठी २ डिसेंबर रोजी सरकारला अर्ज सादर केला. २१ डिसेंबर राेजी त्यांचा अर्ज अमान्य करण्यात आला. परिणामी, त्यांनी न्यायाधिकरणमध्ये धाव घेतली आहे. शारीरिक चाचणीसाठी दुसरी तारीख मिळण्याची विनंती त्यांनी न्यायाधिकरणाला केली आहे. खोब्रागडे यांच्यातर्फे ॲड. कुलदीप महल्ले यांनी कामकाज पाहिले.