विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारतकरिता पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:15+5:302020-12-30T04:11:15+5:30
नागपूर : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केले. ...

विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारतकरिता पुढे यावे
नागपूर : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केले. देशाच्या विकासामध्ये अभियंत्यांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली, असेही त्यांनी सांगितले.
विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी(व्हीएनआयटी)चा १८ वा दीक्षांत समारंभ सोमवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडला. त्यावेळी पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, एल ॲण्ड टी कंपनीचे आजीवन संचालक जे. डी. पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान, पोखरियाल यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच व्हीएनआयटीने कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली.
विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या उत्कर्षाकरिता पुढे येण्याची हीच खरी वेळ आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पालकांचा त्याग विसरू नये. संस्थेतून मिळालेल्या शिक्षणाचा त्यांनी देशाकरिता उपयोग करावा, असे धोत्रे म्हणाले. व्हीएनआयटी संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी प्रास्ताविक केले. व्हीएनआयटी वेगात प्रगती करीत आहे. त्यात विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले. रजिस्ट्रार डॉ. एस. आर. साठे यांनी आभार मानले.
-----------
११३४ पदव्या वितरित
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ११३४ पदव्या वितरित करण्यात आल्या. त्यात ६१ पीएच.डी., २६८ मास्टर ऑफ टेक्नालॉजी, ९४ मास्टर ऑफ सायन्स, ६४८ बॅचलर ऑफ टेक्नालॉजी व ६३ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदव्यांचा समावेश होता. याशिवाय ४५ पदके प्रदान करण्यात आली.
---------
हे विद्यार्थी सन्मानित
बी.टेक. विद्यार्थी अब्दुल सत्तार मोहम्मद अश्रफ मपारा व चेतना श्रीवास्तव यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.