पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के
By निशांत वानखेडे | Updated: August 28, 2023 17:18 IST2023-08-28T17:17:36+5:302023-08-28T17:18:32+5:30
दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाद्वारे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालात नागपूर जिल्ह्याची स्थिती वाईट असून नागपूर विभागातील पोरं जेमतेम काठावर पास झाली आहेत.
दहावीच्या परीक्षेत नागपूर जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वात निचांकीवर आहे. जिल्ह्यात नोंद केलेल्या २०२० पैकी १९११ विद्यार्थी परीक्षेला बसले व त्यातील ४९७ उत्तीर्ण झाले. म्हणजे केवळ २६ टक्के मुलांनी दुसऱ्या संधीत यश मिळविले. गेल्या वर्षीपेक्षा घसरण झाली आहे. विभागातून या निकालात चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक ६७.७६ टक्के व त्या खालोखाल भंडारा ६७.०५ टक्के व गोंदिया ६३.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गडचिरोलीत ४७.२७ टक्के व वर्ध्यात ३४.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागाचा एकूण निकाल ४१.९० टक्के असून राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बारावीच्या निकालाची अवस्थासुद्धा विदारक आहे. नागपूर जिल्ह्यात बारावीत ३८४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व केवळ १३९८ म्हणजे ३६.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात विज्ञान शाखेचा टक्का बऱ्यापैकी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेतील १६१७ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली व ९४९ म्हणजे ५८.६८ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले. यात मुलींपेक्षा मुलांचा टक्का अधिक आहे. कला शाखेत १०४३ पैकी जेमतेम २५२ म्हणजे केवळ २४.१६ टक्के विद्यार्थी पास झाले. वाणिज्य शाखेत परीक्षा दिलेल्या १०१४ पैकी केवळ १५६ म्हणजे केवळ १५.३८ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विज्ञान शाखेत नागपूर विभागाचा निकाल ५९.४८ टक्के इतका आहे. कला शाखेत २४.३३ टक्के तर वाणिज्य शाखेत जेमतेम १७.६९ टक्के आहे.
नागपूर विभाग १२ वी निकाल
जिल्हा - बसले - उत्तीर्ण - टक्के
नागपूर - ३८४५ - १३९८ - ३६.३५
भंडारा - ३५८ - १५६ - ४३.५७
चंद्रपूर - ९७५ - ४५५ - ४६.६६
गडचिराेली - २१० - ९२ - ४३.८०
वर्धा - ११०४ - ३३० - २९.८९
गोंदिया - १९८ - ८७ - ४३.९३