नागपूर विद्यापीठातील गैरव्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप ; अभाविपचा विद्यापीठावर धडक मोर्चा
By आनंद डेकाटे | Updated: November 13, 2025 17:32 IST2025-11-13T17:30:28+5:302025-11-13T17:32:21+5:30
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या अनियमितता आणि अव्यवस्थेविरोधात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने जोरदार ‘धडक मोर्चा’ काढला.

Students' anger against mismanagement in Nagpur University; ABVP stages protest at the university
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठात सुरू असलेल्या अनियमितता आणि अव्यवस्थेविरोधात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने जोरदार ‘धडक मोर्चा’ काढला. हा मोर्चा रविनगर मैदानातून सुरू होऊन विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेला, जिथे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले.
मोर्चाचे नेतृत्व विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके यांनी केले. त्यांनी यावेळी विद्यापीठात उशिरा प्रवेशप्रक्रिया पार पडणे, अपूर्ण अभ्यासक्रम असतानाच परीक्षा घेणे, कायमस्वरूपी शिक्षकांची भरती न करणे, तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक पात्रतेचे निकष न पाळता करणे, इतर पदांची भरती वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणयोग्य रीतीने अंमलात न आणणे अशा आरोपांची यादी मांडली.
विद्यार्थ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून विद्यार्थी संघ निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रणाली गोमासे यांनी विद्यापीठातील सुविधा नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, विद्यापीठात ना बायोमेट्रिक उपस्थिती यंत्र आहेत, ना सीसीटीव्ही कॅमेरे, आणि ना विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन उपलब्ध आहेत. “स्मार्ट क्लासरूम” नावाला आहे, पण अजूनही जुन्या हिरव्या फळ्यावरच शिकवणी चालते, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय अनिकेत दादंडे, शिवम काले, मोसम पटले, दीपांशू गौर आणि प्रणित सदाफले यांनीही विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.
विद्यापीठाचे रजिस्ट्रार राजू हिवसे यांनी मोर्चाला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारले. त्यांनी या सर्व मागण्या कुलगुरू डॉ. माधवी खोडे यांच्यासमोर मांडण्याचे आश्वासन दिले आणि समस्यांवर उपाय शोधण्याची ग्वाही दिली. यावर एबीव्हीपीने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहील. संचालन वीरेंद्र पौणीकर यांनी केले.
अशा आहेत प्रमुख मागण्या
- विद्यापीठाचा शैक्षणिक दिनदर्शिका वेळेत तयार व्हावी
- प्रवेशाची अंतिम तारीख १५ ऑगस्ट निश्चित करावी.
- प्रवेशप्रक्रियेची सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवावी.
- विद्यार्थी संघ निवडणुका तातडीने सुरू कराव्यात.
- प्रवेशप्रक्रियेत दलाल व एजंट्स यांच्यावर कडक कारवाई करावी.
- शुल्क निर्धारण पारदर्शक व्हावे आणि माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावी.
- परीक्षा व पुनर्मूल्यांकनाचे निकाल ४५ दिवसांत जाहीर करावेत आणि दोषींवर कारवाई व्हावी.
- परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
- एनईपी सुधार समिती स्थापन करून स्थानिक भाषांमध्ये अभ्यासक्रम सुरू करावेत.
- कायमस्वरूपी प्राध्यापक व कर्मचारी यांची भरती तातडीने करावी.