जर बोलली नाहीस तर चाकूने जीवच घेतो, विद्यार्थिनीचा भर रस्त्यात विनयभंग
By योगेश पांडे | Updated: January 12, 2024 16:25 IST2024-01-12T16:24:18+5:302024-01-12T16:25:01+5:30
विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिला बोलण्याची जबरदस्ती केली व बोलली नाहीस तर चाकूने जीव घेण्याची धमकी दिली.

जर बोलली नाहीस तर चाकूने जीवच घेतो, विद्यार्थिनीचा भर रस्त्यात विनयभंग
योगेश पांडे,नागपूर : एका आरोपीने कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिला बोलण्याची जबरदस्ती केली व बोलली नाहीस तर चाकूने जीव घेण्याची धमकी दिली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सूरज अजय हावरे (३०, अंबाझरी) असे आरोपीचे नाव आहे. तो १६ वर्षीय विद्यार्थिनीचा अनेकदा पाठलाग करायचा. ११ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता विद्यार्थिनी क्लासला जात असताना सूरजने तिला अडवले. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे अशी तो जबरदस्ती करू लागला. तिने नकार दिला असता तो संतापला. तू माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुला चाकूने मारेन, अशी धमकी त्याने दिली.
त्यानंतर त्याने भर रस्त्यात तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनीने कसाबसा तेथून पळ काढला व घरी जाऊन पालकांना या प्रकाराची माहिती दिली. तिच्या पालकांच्या तक्रारीवरून सूरजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.