वहिनीच्या रागावर विद्यार्थिनीने सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:01 IST2019-10-31T23:00:48+5:302019-10-31T23:01:39+5:30
वहिनी नेहमीच टोचून बोलते, तिला आपण आवडत नाही, याचा राग मनात धरून एका विद्यार्थिनीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. होशंगाबादवरून तिने विनातिकीट नागपूर असा प्रवास केला.

वहिनीच्या रागावर विद्यार्थिनीने सोडले घर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वहिनी नेहमीच टोचून बोलते, तिला आपण आवडत नाही, याचा राग मनात धरून एका विद्यार्थिनीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. होशंगाबादवरून तिने विनातिकीट नागपूर असा प्रवास केला. प्रवासात रेल्वे तिकीट तपासनीसाची नजर तिच्यावर गेली आणि त्याने या विद्यार्थिनीला रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले.
होशंगाबाद येथील रहिवासी निकिता (बदललेले नाव) ही बी. एस्सीच्या प्रथम वर्गाला शिकते. तिच्या घरात आईवडील, भाऊ आणि वहिनी आहे. निकिताला तिची वहिनी नेहमीच टोचून बोलते. त्यामुळे ती कंटाळली होती. अशातच तिने घरातून निघून जाण्याचा विचार केला. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली. महाविद्यालय सुटल्यानंतर घरी न परतता तिने रेल्वेस्थानक गाठले. ती १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसच्या एस ८ कोचमध्ये बसली. कुठे जायचे याचा विचारही तिने केला नव्हता. होशंगाबादवरून ती तिकीट न घेताच गाडीत बसली. गाडीतील तिकीट तपासनीस एस. एन. पाटील यांची नजर तिच्यावर गेली. ती घरातून निघून जात असावी, अशी शंका त्यांना आली. तिची चौकशी केली असता सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच त्यांनी या विद्यार्थिनीला रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक सुरेश कामिलकर, राजू खोब्रागडे, नीता माझी यांच्या स्वाधीन केले. रेल्वे सुरक्षा दलाने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तिला घेण्यासाठी तिचे नातेवाईक होशंगाबादवरून नागपूरला निघाले.