पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा प्रवाशांनी घेतला आनंद
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे प्रवाशांना पाहता यावीत यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या पर्यटन विशेष बसला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बसमध्ये प्रवासी अधिक झाल्यामुळे पाच ते सहा प्रवाशांना परत जावे लागले.
नागपूर जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. परंतु या पर्यटनस्थळांना जाण्यासाठी आतापर्यंत एसटीची बस उपलब्ध नव्हती. त्यासाठी एसटी महामंडळाने नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटन विशेष बस सुरू केली. रविवारी १० जानेवारीला या बसचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बसमधील प्रवाशांचे गुलाबाचे फूल आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. बसमध्ये ४४ प्रवासी बसल्यानंतर ही बस गणेशपेठ बसस्थानकावरून रवाना झाली. सुराबर्डी, आदासा, रामटेक, खिंडसी, ड्रॅगन पॅलेस आदी ठिकाणी ही बस प्रवाशांना घेऊन गेली. एकाच दिवशी एवढे पर्यटनस्थळ पाहता येणार असल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटन विशेष बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बसच्या शुभारंभप्रसंगी गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, इमामवाड्याचे आगार व्यवस्थापक नीलेश धारगावे, बसस्थानक प्रमुख दीपक तामगाडगे, वाहतूक निरीक्षक अजय पवार उपस्थित होते.
...........