नागद्वार यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी लालपरीची विशेष सेवा
By नरेश डोंगरे | Updated: July 19, 2025 17:59 IST2025-07-19T17:58:39+5:302025-07-19T17:59:02+5:30
एसटीच्या स्पेशल बसेस : दुपारी दर अर्धा तासानंतर आणि रात्री दर १५ मिनिटांनी बस उपलब्ध

ST's special service for devotees going to Nagdwar Yatra
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेला जाण्यासाठी भाविकांची चांगली सोय व्हावी म्हणून एसटी महामंडळाने नागपूरच्या गणेशपेठ मुख्य बसस्थानकावरून लालपरीची विशेष सेवा सुरू केली आहे. रविवार, २० जुलैपासून दुपारी दर अर्धा तासानंतर तर रात्री दर १५ मिनिटांनंतर एसटीची लालपरी नागद्वार यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
यात्रेसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसला परवानगी देण्यासंदर्भात एमपी प्रशासनाची नकारघंटा सुरू होती. शुक्रवारी १८ जुलैला तसे वृत्त लोकमतने ठळकपणे प्रकाशित केले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मध्य प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडून शुक्रवारी रात्री एसटी महामंडळाला नागद्वार यात्रेसाठी भाविकांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली. आज शनिवारीपासून यात्रेला प्रारंभ झाला असून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने रविवारी २० जुलैपासून नागद्वार यात्रेसाठी स्पेशल बसेस चालविण्याचे वेळापत्रक शनिवारी जाहीर केले. त्यानुसार, २० ते ३० जुलैपर्यंत गणेशपेठ बसस्थानकावरून भाविकांना रोज २४ बसेस नागद्वार यात्रेसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे परत आणण्यासाठीही दररोज २४ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूर ते पचमढी बस
बसेसच्या वेळा : दुपारी ४ वाजता, ४.३० वाजता, सायंकाळी ५ वाजता, ५.३०, ६ वाजता, ६.१५ वाजता, ६.३०, ६.४५ वाजता, रात्री ७ वाजता, ७.१५, ७.३०, ७.४५, ८ वाजता, ८.१५. ८.३०, ८.४५, ९ वाजता, ९.३०, ९.४५, १० वाजता, १०.१५, १०.३०, १०.४५ आणि रात्री ११ वाजता जत्रा स्पेशल बस भाविकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
पंचमढी ते नागपूर बस
दुपारी ३ वाजता, ३.१५, ३.३०, ४ वाजता, ४.४०, ५ वाजता, ५.३०, सायंकाळी ५.४५, ६ वाजता, ६.३०, रात्री ७ वाजता, ७.१५, ७.३०, ७.४५, ८ वाजता, ८.१५, ८.३०, ८.४५, ९ वाजता, ९.१५, ९.३०, ९.४५, १० वाजता, १०.१५ आणि रात्री १०.३० वाजता.
आरक्षणाचीही सुविधा
नागद्वार यात्रेकरिता जाणाऱ्या भाविकांसाठी गणेशपेठ बसस्थानकावर आगावू तिकीट आरक्षण करण्याचीही सुविधा एसटीने करून दिली आहे. अधिक माहितीसाठी प्रवासी गणेशपेठ बसस्थानकावरील दुरध्वनी क्रमांक ०७१२- २७२६२०१ आणि २७२६२२१ तसेच ७६२०१५२९३५, ९६८९१००५०१ या मोबाईल नंबरवरही संपर्क करू शकतात.