दिवाळीत वाढले एसटीचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:20+5:302020-12-04T04:25:20+5:30
नोव्हेंबर महिन्यात मिळाले १२ कोटी : एसटीवर वाढतोय प्रवाशांचा विश्वास नागपूर : लॉकडाऊनमुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. ...

दिवाळीत वाढले एसटीचे उत्पन्न
नोव्हेंबर महिन्यात मिळाले १२ कोटी : एसटीवर वाढतोय प्रवाशांचा विश्वास
नागपूर : लॉकडाऊनमुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. परंतु त्यानंतर दिवाळीत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला दिवसाकाठी ४० लाख रुपये मिळत असून नोव्हेंबर महिन्यात एसटीच्या नागपूर विभागाला १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळात २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला. त्यानंतर आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद वाहतुकीला मिळाला. जुलै, ऑगस्टमध्ये दररोज ३० हजार किलोमीटर बसेस चालविण्यात आल्या. विभागाला त्यानुसार ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले. महामंडळाला तोटा होत असतानाही प्रवासी वाढण्याच्या अपेक्षेने बसेस सुरू होत्या. एसटी महामंडळाने कोरोनाच्या नियमांचे पालन करून वाहतूक सुरू ठेवली. त्यामुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास वाढला. एसटी बसेसच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ होऊन ऑक्टोबर महिन्यात दररोज ९० हजार किलोमीटर आणि १८ लाख रुपयांचे उत्पन्न वाढले. नोव्हेंबर महिन्यात दररोज १ लाख २० हजार किलोमीटर बसेस चालविण्यात आल्या. यातून विभागाला ४० लाख रुपये प्रतिदिन उत्पन्न मिळाले. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात विभागाला १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यावरून प्रवाशांचा एसटीवरील विश्वास वाढल्याची बाब स्पष्ट झाली आहे. डिसेंबर महिन्यात अशीच वाहतूक सुरू राहून ग्रामीण भागातील फेऱ्याही वाढविण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.
...........