पावसामुळे थांबली एसटीची चाके : प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 20:11 IST2018-07-06T20:04:04+5:302018-07-06T20:11:27+5:30
मुसळधार पावसाचा एसटीच्या वाहतुकीवरही परिणाम होऊन ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली. यात विमानतळाजवळ पाणी साचल्यामुळे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती तर उमरेड आणि रामटेक आगाराच्या ८० टक्के बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

पावसामुळे थांबली एसटीची चाके : प्रवाशांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसाचा एसटीच्या वाहतुकीवरही परिणाम होऊन ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली. यात विमानतळाजवळ पाणी साचल्यामुळे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती तर उमरेड आणि रामटेक आगाराच्या ८० टक्के बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
शुक्रवारी मुसळधार पावसामुळे विमानतळाजवळ प्रचंड पाणी साचल्यामुळे नागपूरवरून चंद्रपूर आणि वर्ध्याला जाणाºया एसटीच्या बसेस दुपारी १.३० ते ४ पर्यंत बंद होत्या. पारशिवनी मार्गावरही बसेस दुपारी २ ते ३.३० पर्यंत धावू शकल्या नाहीत. उमरेड मार्गावर डब्ल्यूसीएलचा नाला ओव्हर फ्लो झाल्यामुळे गडचिरोली आणि उमरेड मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन बसेस बंद होत्या. तर कामठी मार्गावर पाणी साचल्यामुळे रामटेक आगाराची वाहतूक दुपारी १ ते ३.४५ दरम्यान ठप्प झाली होती. सायंकाळच्या सुमारास काटोल आगाराच्या बसेसही पाण्यामुळे आगाराबाहेर पडल्या नसल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. शहरातील गणेशपेठ, वर्धमाननगर, घाट रोड डेपो आणि इमामवाडा आगारातील वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.