संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:34 IST2025-12-23T16:33:12+5:302025-12-23T16:34:05+5:30
रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या भूमिका मंडपे यांनी आजवर घराघरात आरोग्यसेवा पोहोचवली. त्यांनी केलेल्या सेवेचे नगराध्यक्ष निवडणुकीत फळ मिळाले.

संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल
नागपूर : नीलडोह नगरपंचायतीच्या राजकारणाला संघर्ष, कष्ट आणि प्रामाणिकतेची नवी ओळख मिळाली आहे. नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच एका आशा वर्करने नगराध्यक्षपदाचा मान पटकावला असून, भूमिका रामू मंडपे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. रविवारी पार पडलेल्या मतमोजणीत त्यांचा विजय निश्चित झाला.
रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या भूमिका मंडपे यांनी आजवर घराघरात आरोग्यसेवा पोहोचवली. माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, स्वच्छता, पोषण आणि विविध सरकारी योजनांची माहिती देताना त्यांनी गावकऱ्यांशी केवळ व्यावसायिक नव्हे, तर भावनिक नाते जोडले.
हातगाडीवर विकली सौंदर्य प्रसाधने
आज त्या नगराध्यक्ष म्हणून शहराच्या कारभाराची धुरा सांभाळणार आहेत. भूमिका मंडपे यांचा हा प्रवास सहजसाध्य नव्हता. परिस्थिती हलाखीची असल्याने लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. २५ वर्षे महिलांची सौंदर्यप्रसाधने हातगाडीवर विकून त्यांनी संसाराचा गाडा हाकला.
२०११ मध्ये रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर म्हणून त्यांनी सेवाकार्य सुरू केले. आरोग्यसेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांचा विश्वास संपादन करत असतानाच राजकारणाची पहिली चाचणी त्यांनी २००८ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत दिली. नोकरी सांभाळत भारतीय जनता पक्षाचे काम सातत्याने करत राहिल्या. अखेर स्थानिक नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली व त्या विश्वासाला विजयात रूपांतरित केले.
सेवेचे रुपांतर जबाबदारीत झाले
या विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगाध्यक्ष भूमिका मंडपे म्हणाल्या, "आधी मी सेवा करत होते, आता त्या सेवेचं रूपांतर जबाबदारीत झालं आहे. गावात सर्वांशी प्रेमाने वागले, चांगले संबंध जपले, म्हणूनच ही संधी मिळाली. निलडोहातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, समस्या सोडवणे आणि सर्वसमावेशक विकास साधणे हेच माझे ध्येय असेल."