उदबत्तीच्या सुगंधासाठी बांबू उत्पादनाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 10:44 IST2020-10-27T10:41:12+5:302020-10-27T10:44:48+5:30
Bambu Nagpur News देशाच्या आयात-निर्यात धोरणामध्ये सुधारणा करण्यासोबतच देशातच उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.

उदबत्तीच्या सुगंधासाठी बांबू उत्पादनाची धडपड
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत विशेष
नागपूर - देशामध्ये उदबत्तीच्या वापरासाठी उपयोगात येणाऱ्या बांबूची मागणी आणि वापरही भरपूर आहे. असे असले तरी देशातील उत्पादन फक्त १५० मेट्रिक टन आहे. त्यातुलनेत मागणी मात्र ६ ते ७ हजार मेट्रिक टनाची आहे. मागणी अधिक आणि उत्पादन कमी या असंतुलनामुळे देशात बांबू आयात करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून यासाठी उपयुक्त बांबूचे उत्पादन देशातच वाढविण्याचा प्रयोग सरकारने हाती घेतला आहे.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून सध्या राष्ट्रीय बांबू मिशन योजना राबविली जात आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असून, उपयुक्त असलेल्या प्रजातीही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशातील उदबत्तीच्या बांबूची गरज भागविण्यासाठी आजवर चीन आणि व्हिएतनाममधून बांबूची आयात केली जायची. मात्र आता भारताचे संबंध चीनसोबत बरेच ताणले गेले आहे.
देशाच्या आयात-निर्यात धोरणामध्ये सुधारणा करण्यासोबतच देशातच उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. याचाच भाग म्हणून अगरबत्तीसाठी उपयोगात येणाऱ्या बांबूच्या उत्पादनवाढीसाठी टुल्डा या प्रजातीचा बांबू देशातच विकसित केला जात आहे. या बांबूचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोन पेरा यामध्ये अंतर जवळपास एक फुटाचे असते. तसेच तो नरमही असतो. त्यामुळे अगरबत्तीच्या निर्मितीसाठी तो अधिक सोईचा ठरतो. विशेष म्हणजे, हा बांबू चीन आणि व्हिएतनाम या देशांमध्येच मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे त्यावर संशोधन करून टिश्यू कल्चरच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर या प्रजातीच्या बांबूच्या रोपांची निर्मिती केली जात आहे. विदभार्तील वातावरणात या बांबूचे पीक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे.
महाराष्ट्र बांबू विकास मिशनने यासाठी पुढाकार घेतला असून, राज्यात वाहतुकीच्या दृष्टीने जवळ पडतील अशा सात उत्पादकांना अधिकृत पुरवठादार म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या रोपांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बांबू मिशनअंतर्गत जुलै-२०२० पासून या माध्यमातून या आठ प्रकारच्या बांबूच्या कलमा शेतक?्यांना पुरविण्यात आल्या आहेत. त्यात टुल्डाचाही समावेश आहे. पुढील तीन वर्षांनंतर त्याचे उत्पादन हाती येणार आहे.
- टी.एस.के. रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर