नागपूर शहरातील पूल, इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:10 IST2025-07-05T20:07:57+5:302025-07-05T20:10:15+5:30

Nagpur : नगरविकास विभागाकडून मनपाला निर्देश

Structural audit of bridges and buildings in Nagpur city to be conducted | नागपूर शहरातील पूल, इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Structural audit of bridges and buildings in Nagpur city to be conducted

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका शहरातील पूल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला निर्देश दिले आहे. मनपाच्या नगररचना विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, विभागाचे अधिकारी झोननिहाय आराखडा तयार करून लवकरच इमारती व पुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करणार आहे.


शहरातील सरकारी कार्यालये, निवासी इमारती, व्यापारी संकुल, शाळा, रुग्णालये यांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे, तर शहरातील धार्मिक व पर्यटन स्थळांच्या वास्तू व गर्दीच्या स्थळांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. जुन्या व देखभाल दुरुस्ती होत नसलेल्या इमारती पावसाळ्यात गळतात, गंजतात, पाया कमजोर होऊन कोसळण्याची भीती असते. त्यामुळे राज्य सरकारने हे निर्देश पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिले आहे.


स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्थापत्य अभियंत्यांकडून इमारतींची किंवा पुलांची अवस्था तपासून घेतली जाईल. यामध्ये एखादी इमारत किंवा पूल धोकादायक स्थितीत आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येईल.


मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना

  • धोकादायक इमारती अथवा पुलांना बॅरिकेड लावणे किंवा सील करणे.
  • खासगी मालमत्ता असल्यास मालमत्ताधारकांना नोटीस बजावणे.
  • तातडीने दुरुस्ती किंवा पाडकाम सुरू करणे.
  • जास्त जोखम असलेल्या इमारतींमधून रहिवाशांचे स्थलांतर करणे.
  • धोकादायक क्षेत्रांमध्ये लोकांचा प्रवेश थांबवणे. 


खासगी इमारतीच्या मालकांवर कायदेशीर कारवाई
महत्त्वाचे म्हणजे, खासगी इमारतीही या तपासणीपासून वगळलेल्या नाहीत. जर एखादी खासगी इमारत धोकादायक आढळली, तर तिच्या दुरुस्तीसाठी जबाबदारी संबंधित मालकावर असेल. दुरुस्ती करण्यात अपयश आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


झोननिहाय आराखड्याला तयार करणार
मनपाने आता झोननिहाय आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे. महाल, सीताबर्डी, गांधीबाग आणि फुटाळा तलाव तसेच दीक्षाभूमी परिसरातील इमारतींची लवकर तपासणी होणार आहे. कारण या भागांमध्ये नागरिकांची वर्दळ जास्त असते.

Web Title: Structural audit of bridges and buildings in Nagpur city to be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर