जिभेचे लाड थांबवा, तिखट मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:07 IST2021-09-03T04:07:17+5:302021-09-03T04:07:17+5:30
नागपूर : तिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असेल, तर वेळीच सांभाळा. तिखट व गरम मसाल्यांमुळे आम्लता (ॲसिडिटी) वाढून अल्सर ...

जिभेचे लाड थांबवा, तिखट मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर!
नागपूर : तिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असेल, तर वेळीच सांभाळा. तिखट व गरम मसाल्यांमुळे आम्लता (ॲसिडिटी) वाढून अल्सर होण्याची शक्यता असते. शिवाय, दूषित अन्न व पाण्यामुळे ‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्गामुळेसुद्धा अल्सर होण्याचा धोका वाढतो. मसालेदार पदार्थ शरीरातील फॅडी ॲसिडस् वाढवतात. यामुळे पोटाच्या आजाराप्रमाणेच लठ्ठपणा, हृदयाचेदेखील आजार बळावतात.
अल्सर म्हणजे पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास होणारी जखम. पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिड या पाचक रसाचा परिणाम या अवयवांच्या आतील आवरणावर होऊन अल्सर होतो. योग्य उपचार व पथ्यांमुळे अल्सर लवकर बरा होऊ शकतो. अल्सरमुळे पोट दुखणे, वारंवार पित्त होणे, पोटात जळजळणे, आग होणे यासारखे त्रास होतात, अशी लक्षणे असल्यास अनेक जण आम्लपित्त म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. अल्सरवर वेळीच उपचार न केल्यास तो गंभीर होऊन पोट किंवा आतड्याला छिद्र पडणे, पोटात रक्तस्राव होण्याची शक्यता बळावते.
लक्षणे
-रात्री जेवणाची इच्छा नसणे.
- पोटाच्या वरच्या बाजूला वारंवार दुखणे.
- रात्री अपरात्री पोट दुखणे.
-पोट फुगल्यासारखे वाटणे.
- थकवा येणे, वजन कमी होणे.
- छातीत व पोटात जळजळणे.
- केस गळणे.
- मळमळ आणि उलट्या होणे.
:: काय काळजी घ्यायला हवी
-तिखट, मसालेदार, खारट, लोणची, पापड, फास्टफूड आदी पदार्थ खाणे टाळायला हवे.
-दूषित अन्न, उघड्यावरील व कच्चे अन्नपदार्थ खाऊ नये.
-अल्सर असल्यास ग्लासभर दूध आहारात घ्यावे.
- दह्याचा आहारात समावेश करावा.
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे समाविष्ट करावीत.
- उपाशीपोटी फार वेळ राहू नये. जेवणाचा वेळा कटाक्षाने पाळाव्यात.
ट्रेसमुळेही अल्सरचा धोका
ज्या रुग्णांमध्ये ॲसिडिटीचे प्रमाण जास्त आहे आणि ते जर नेहमीच ‘ट्रेस’ म्हणजे तणावात राहत असतील, तर त्यांच्या शरीरात ॲसिड वाढूनही अल्सर होण्याची शक्यता असते. ॲसिडिटीवर स्वत:हून औषधी घेऊ नये. इनो किंवा सोड्याचे वारंवार सेवन केल्यास नंतर औषधांचा प्रभाव पडत नाही. सध्या नागपुरात ‘एच पायलोरी’मुळे होणारा ‘अल्सर’वाढला आहे. यामुळे दूषित अन्न, पाणी व कच्चे अन्नपदार्थ टाळायला हवेत.
-डॉ. अमोल समर्थ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट