नागपुरातील पाचपावलीत सापडला तलवारींचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:36 IST2018-08-29T21:35:24+5:302018-08-29T21:36:27+5:30
घरात तलवारींचा साठा ठेवणारा तरुण गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला. आरोपी तरुणाचे मंगळवारीच लग्न झाले. त्याच्या घरातून पोलिसांनी १० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई तांडापेठ येथील नई बस्ती येथे करण्यात आली.

नागपुरातील पाचपावलीत सापडला तलवारींचा साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरात तलवारींचा साठा ठेवणारा तरुण गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला. आरोपी तरुणाचे मंगळवारीच लग्न झाले. त्याच्या घरातून पोलिसांनी १० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई तांडापेठ येथील नई बस्ती येथे करण्यात आली. राहुल ऊर्फ रोहित शंकर ठोसर (२२) रा. तांडापेठ असे आरोपीचे नाव आहे.
राहुल पाचपावली परिसरातील एका रमी क्लबमध्ये काम करतो. तो पूर्वी गुन्हेगारी कृत्यात सहभागी होता. त्याच्याविरुद्ध हल्लाप्रकरणी एक गुन्हाही दाखल आहे. त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बुधवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची तपासणी केली असता, लपवून ठेवलेल्या १० तलवारी सापडल्या.
राहुलने जप्त करण्यात आलेल्या तलवारी दोन वर्षांपूर्वी बाबा बुद्धाजीनगर येथे लागणाऱ्या मेळ्यातून खरेदी केल्या होत्या. या मेळाव्यात दरवर्षी बाहेरील जिल्ह्यातील शीख व्यापारी येतात. ते तलवारीची विक्री करतात. त्यांच्याकडूनच त्याने तलवारी खरेदी केल्या होत्या. परंतु तलवारी का खरेदी केल्या? याचे उत्तर मात्र त्याच्याकडे नाही. राहुल रमी क्लबमध्ये काम करतो. तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत-जात असतात. ते शस्त्रांचेही खरेदीदार असतात. त्यांना शस्त्र विकण्याच्या उद्देशाने राहुलने तलवारी खरेदी केल्या असाव्यात, असा पोलिसांना संशय आहे. यात पोलिसांचे अपयशही दिसून आले. दोन वर्षांपासून त्याच्याकडे शस्त्रे होती, परंतु पोलिसांना त्याची माहिती मिळाली नाही. राहुलच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वस्तीतीलच एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. आर्थिक परिस्थितीमुळे मंगळवारी त्याने एका धार्मिक स्थळी लग्न केले. बुधवारी घरीच जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वीच त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली. मेहंदी लागलेल्या हाताला हातकडी लागलेल्या पाहून कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.
ही कारवाई एपीआय किरण चौगुले, प्रदीप अतुलकर, पीएसआय मनीष वाकोडे, एएसआय रमेश उमाठे, हवालदार बट्टूलाल पांडे, नृसिंह दमाहे, सतीश मेश्राम, सुधाकर धंदर, अजय रोडे, देवेंद्र चव्हाण, शिपाई सतीश निमजे, रवींद्र राऊत, प्रशांत कोडापे, आशिष क्षीरसागर, अविनाश ठाकूर, नेत्रा उमाठे, ज्ञानेश्वर तांदूळकर, दीपक झाडे आणि राजेंद्र तिवारी यांनी केली.